- भारताच्या ‘गोदावरी’ मराठी चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार
- ‘सेव्हिंग वन हू इज डेड’ चे व्हक्लाव्ह कद्रन्का सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- गीतकार प्रसून जोशी ठरले ‘इंडियन पर्सोनालिटी ऑफ द इयर’
- जितेंद्र जोशी उत्कृष्ट अभिनेता
- अंजेला मोलिना उत्कृष्ट अभिनेत्री
- ’ए हिरो’ या पार्शियन चित्रपटाने इफ्फीची सांगता
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात आयोजित 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी बांबोळी येथील श्यामाप्रसाद स्टेडियमवर रंगतदार आणि दिमाखदार सोहळ्य़ात समारोप करण्यात आला. जपानच्या ‘रिंग वॉन्डरिंग’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्णमयुर प्राप्त झाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ‘सेव्हिंग वन हू इज डेड’ या झेकोस्लावियन चित्रपटाचे व्हक्लाव्ह कद्रन्का यांना रौप्य मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याशिवाय ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. त्या चित्रपटाचे जितेंद्र जोशी यांना उत्कृष्ट अभिनेता तर ‘द फर्स्ट फॉलन’ ब्राझिलियन चित्रपटातील रेनाटा कार्व्हालोला आणि निखिल महाजन यांच्या गोदावरी चित्रपटाला विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार संयुक्तरित्या देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अंजेला मोलिना (स्पॅनिश) यांना रौप्य मयूर पुरस्कार देण्यात झाला. ‘इंडियन पर्सोनालिटी ऑफ द इयर- 2021’ म्हणून सुप्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांना सन्मानित करण्यात आले.
गेले नऊ दिवस चाललेल्या या इफ्फीच्या समारोप सोहळ्य़ास केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सुप्रसिद्ध अभिनेता रणधीर कपूर, मनोज वाजपेयी, अभिनेत्री पद्मश्री माधुरी दीक्षित यांच्यासह विविध स्पर्धांचे ज्युरी सदस्य, तसेच देशविदेशातील अनेक कलाकार उपस्थित होते.
देशविदेशातील निर्मात्यांनी गोव्यात यावे : मुख्यमंत्री
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, गोवा हे शुटिंगसाठी उत्कृष्ट स्थळ व्हावे, चित्रपटांचे केंद्र बनावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर भारतासह जगभरातील चित्रपट निर्मात्यांनी गोव्यात यावे, असे आवाहनही केले. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करमणूक संस्थेच्या माध्यमातून गोवा सरकार करेल असे आश्वासन देऊन पुढील आंचिम यापेक्षाही अधिक सुंदर बनविण्यासाठी आम्ही वटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.
शानदार व संस्मरणीय अशा सोहळ्य़ातून अमर्याद सृजनशिलता आणि कल्पनेचा आविष्कार पाहण्यास मिळाला, असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्व मान्यवर तसेच पुरस्कारप्राप्त चित्रपट, त्यांचे कलाकार, दिग्दर्शक यांचे त्यांनी अभिनंदन केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी वावरलेले सर्व कर्मचारी, तसेच अधिकारीवर्गाला धन्यवाद दिले.
युद्धग्रस्त काळानंतर विस्मृतीत गेलेल्या, भूतकाळात दडलेल्या हजारो आत्म्यांना समर्पित ‘रिंग वॉन्डरिंग’ या मासाकाझू कानेको दिग्दर्शित जपानी चित्रपटाला प्रतिष्टेचा सूवर्ण मयूर तर सुप्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांना ‘इंडियन पर्सोनालिटी ऑफ द इयर- 2021’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
झेक दिग्दर्शक वाक्लॅव काद्रंका यांच्या ‘सेव्हिंग वन हू इज डेड’ चित्रपटाला रजत मयूर पुरस्काराचा मान प्राप्त झाला. तर भारताचा गोदावरी चित्रपट दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरला.
‘गोदावरी’ आणि दिग्दर्शक रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांच्या ‘द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटात भूमिका साकारणारे ब्राझिलचे अभिनेते रेनाटा कार्व्हालो यांना परीक्षकांचा सुवर्ण मयूर विशेष पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून ‘वेल्थ ऑफ द वर्ल्ड’ ची निवड करण्यात आली.
या महोत्सवात ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हलचेही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ‘द सन अबाव्ह मी नेव्हर सेट’ आणि ‘बरगत’ या चित्रपटांना पुरस्कार प्राप्त झाले. त्याशिवाय ‘ऑन व्हील’ चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी अभिनेत्री लारा बोल्डारानी (ब्राझील) आणि ‘असुरन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी धनूष यांना गौरविण्यात आले.
अभिनेत्री ऐमी बरुआ, वनदीप सहगल, रणधीर कपूर, माधुरी दीक्षित यांच्यासह अन्य अनेक मान्यवरांचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. सर्व मान्यवरांनी आपला गौरवास उत्तर देताना आंचिमच्या उत्कृष्ट आयोजनासाठी गौरवोद्गार काढले.
उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारणार
अनुराग ठाकूर म्हणाले की, चित्रपट निर्मितीसाठी भारत हा जागतिक हब व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. उत्तर प्रदेशमध्ये आशियातील सर्वात मोठय़ा विमानतळाची पायाभरणी झाली असून त्याच्या अगदी जवळच्या परिसरात सुमारे 1 हजार एकर जागेत जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
प्रसून जोशी यांनी बोलताना चित्रपट निर्मितीत शॉर्टकट नसतो. कठोर परिश्रमातूनच चित्रपटाची निर्मिती होते. त्यामुळे एकवेळ तुम्ही चित्रपटाला जादू समजू शकता, परंतु चित्रपट निर्मिती ही जादू समजू नका, असे सांगितले.
समीर कोचर यांनी संपूर्ण सोहळ्य़ाचे सर्वांगसुंदर असे सूत्रसंचालन केले. ‘ए हिरो’ या पार्शियन चित्रपटाने 52 व्या इफ्फीची सांगता करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता आयनॉक्सच्या चारही क्रिनवर हा चित्रपट दाखविण्यात आला.
- सुवर्णमयुर : रिंग वॉन्डरिंग (जपान)
- उत्कृष्ट दिग्दर्शक : व्हक्लाव्ह कद्रका (सेव्हिंग वन हू इज डेड)
- विशेष ज्युरी पुरस्कार : गोदावरी (निखिल महाजन )
- पर्दापणातील उत्कृष्ट चित्रपट : वेल्थ ऑफ द वर्ल्ड
- उत्कृष्ट अभिनेता : जितेंद्र जोशी (चित्रपट – गोदावरी)
- उत्कृष्ट अभिनेत्री : अंजेला मोलिना (स्पॅनिश)
- इंडियन पर्सोनालिटी ऑफ द इयर पुरस्कार : गीतकार प्रसून जोशी