ऑनलाईन टीम / जम्मू :
देशात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीरमध्ये देखील पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढले आहे. सतत वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेत प्रदेशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- सद्य स्थितीत 51 हजार पेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण
दरम्यान, बुधवारी 4 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा 2.29 लाखांच्या वर जावून पोहचला आहे. मागील 24 तासात 4,509 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 65 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 29 हजार 407 वर पोहोचली आहे.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 3,603 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,74,953 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 68,260 रुग्ण जम्मूतील तर 1,06,693 जण काश्मीरमधील आहेत. तर आतापर्यंत 2912 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.