वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय महिला हॉकी संघ जर्मनीच्या दौऱयावर जाणार आहे. अलिकडे भारतीय महिला संघाने अर्जेंटिनाच्या दौऱयात एकूण सात सामने खेळले आहेत. आता राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघ जर्मनीच्या राष्ट्रीय महिला हॉकी संघाबरोबर चार सामने खेळणार आहेत.
जर्मनीच्या दौऱयासाठी भारतीय महिला हॉकी संघामध्ये 18 खेळाडूंचा समावेश असून प्रशिक्षक वर्गातील सात जण संघाबरोबर राहणार आहेत. बेंगळूरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये भारतीय महिला हॉकी संघासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर सुरू होते. आता मंगळवारी बेंगळूर येथून भारतीय महिला हॉकी संघ डय़ुसेलडॉर्फला प्रयाण करणार आहे.
या दौऱयात भारताचा जर्मनीबरोबर पहिला सामना 27 फेब्रुवारीला, दुसरा सामना 28 फेब्रुवारीला होणार आहेत. त्यानंतर एक दिवसाची विश्रांती राहील. भारतीय महिला हॉकी संघाचा जर्मनीबरोबर तिसरा सामना 2 मार्चला तर चौथा आणि शेवटचा सामना 4 मार्चला खेळविला जाईल. आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत जर्मनीचा महिला हॉकी संघ सुवर्णपदकासाठी फेव्हरिट म्हणून ओळखला जातो. दरम्यान, या दौऱयात भारतीय महिला हॉकी संघाला बलाढय़ जर्मनीबरोबर खेळण्याची संधी हॉकी इंडियाने उपलब्ध करून दिली आहे. जर्मनीत प्रवेश करण्यापूर्वी 48 तास अगोदर भारतीय महिला हॉकी संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी घेतली जाईल. भारत आणि जर्मनी शासनाच्या संयुक्त विद्यमाने हा दौरा आयोजित केला असून उभय देशांच्या आरोग्य खात्याकडून कोरोना सुरक्षा नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार आहे.