नवी दिल्ली
वर्ष 2020 हे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले होते. याचा नकारात्मक परिणाम म्हणून विविध क्षेत्रातील उद्योग व्यवसाय अडचणीत राहिले होते. यातील सर्वात महत्वाचे क्षेत्र म्हणून ओळख असणाऱया वाहन क्षेत्रांची स्थिती अतिशय अडचणीत होती. यामध्ये काही प्रमाणात जानेवारी 2021 पासून सुधारणा होत असल्याचे संकेत आहेत. विक्रीसोबत आता निर्यात क्षेत्रही मजबूत होत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जानेवारी 2020 च्या 36,765 वाहनांच्या तुलनेत जानेवारी 2021 मध्ये प्रवासी वाहनांची निर्यात 1.15 टक्क्यांनी वाढून 37,187 युनिटवर आली आहे. हाच आकडा एप्रिल ते जानेवारीच्या दरम्यान वाहनांची निर्यात कमी राहिली आहे. या दरम्यान वर्षभराच्या तुलनेत पाहिल्यास निर्यात 5,77,036 युनिटच्या तुलनेत 43.1 टक्क्यांनी कमी राहून 3,28,360 युनिटवर राहिली आहे. अशी माहिती सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी दिली. जानेवारी 2021 मध्ये निर्यातीत काहीशी सुधारणा होत निर्यात 1.15 टक्क्यांनी वाढली आहे. सदरच्या निर्यातीत मारुती सुझुकीची निर्यात 29.92 टक्क्यांनी वाढून 12,345 वर राहिली आहे. यासोबत हय़ुंदाई मोटार इंडियाची निर्यात 19 टक्क्यांनी घसरुन 8,100 वर आली आहे. निसान मोटार इंडियाची निर्यात 4,198 वर राहिली. किया मोटर्स आणि फोर्डची निर्यात 3,618 आणि 2,983 वर स्थिरावल्याची माहिती आहे. एकंदर, निर्यातीत सुधारणा होत असली तरी, स्थिती पूर्ववत झालेली नसल्याचे दिसते.