सुहास पाटील/ उंडाळे
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अधिकृत नोकर भरती जाहिरात निघाली नसतानाही, जिल्हा बँकेत सत्तेवर असलेल्या राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी कराड तालुक्यात जिल्हा बँकेत नोकरीला लावतो म्हणून लाखो रुपये गोळा करण्यास सुरुवात केली आहे. याविषयी कराड तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे. ही नोकरभरती खोटी ठरल्यास अनेक बेरोजगार युवकांना देशोधडीला लावण्याचे काम या माध्यमातून होईल त्यामुळे याकडे जिल्हा बँक प्रशासनाने गांभीर्याने पाहून लुटारूंच्यापासून वाचण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे.
राज्यात सर्वात नावारूपाला आलेली व नाबार्डचे सलग सात वेळा पुरस्कार मिळालेली एकमेव जिल्हा बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिले जाते. या बँकेत गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी मोठी नोकर भरती करण्यात आली होती. त्या नोकर भरती विषयीही अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली होती. तर काही संचालकांनी या भरतीविषयी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर अनेक तडजोडी होऊन भरती अधिकृत(?) करण्यात आली. आता परत एकदा जिल्हा बँकेची निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सत्तेवर असलेल्या राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या तोंडावर हे संचालक मंडळ मोठी भरती करणार आहे, अशी आवई उठून नोकर भरतीच्या एका जागेचा दर दहा लाखांच्या पुढे ठरवत पैसे गोळा करण्याचा सपाटा लावला आहे.
वास्तविक या नोकर भरतीबाबत विद्यमान संचालक मंडळाने कोणतीच अधिकृत घोषणा अथवा जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. तरीही जिह्याच्या प्रत्येक तालुक्यात नोकर भरतीसाठी पैसे घेणारी सोकावलेली टोळी पैसे गोळा करण्यासाठी गावोगाव धडपडत आहे. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना व प्रत्येकाला नोकरीची असलेली गरज हेरून त्यांना लुटण्यासाठी ही टोळी सक्रिय झाली आहे. जिल्हा बँकेत नोकरभरती करताना गेल्या काही नोकर भरतीचा आढावा घेतला असता अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरले व ज्यांची पात्रता नाही असे जिल्हा बँकेत नोकरी करत आहेत. यावरून यापूर्वीही गोलमाल झाल्याचे लक्षात येते. या गोलमालचा इतिहास बघूनच अनेक जण पैसे गोळा करणाऱयांच्या गळाला लागले आहेत. याकडे जिल्हा बँक प्रशासन व राज्य शासनाने लक्ष देऊन नोकर भरतीच्या नावाखाली सुरु असलेली पैशांची वसुली थांबवावी अशी मागणी होत आहे