ढेबेवाडी
ढेबेवाडीतील सात दुकाने चोरटय़ांनी शनिवार 18 रोजी मध्यरात्री फोडली. यामध्ये दोन दुकानातील मिळून सुमारे 90 हजार रुपये चोरटय़ांनी पळवून नेल्याचे उघड झाले आहे. तर पाच दुकानात चोरटय़ांना हाती काही लागले नाही.
ढेबेवाडी येथे बसस्थानकापासून सणबूरला जाणाऱया रस्त्याच्या कडेला व्यापारी संकुलात दुकान गाळे आहेत. शनिवारी मध्यरात्री चोरटय़ांनी यातील सात दुकानांची शटर्स लोखंडी हत्याराने उचकटली. यामध्ये राजस्थान स्वीटस् या मिठाईच्या दुकानातील ड्रॉव्हरमधील सुमारे 70 हजार रुपये चोरटय़ांनी चोरले. तर सोनल क्लॉथ सेंटरमधील 10 हजार रुपये चोरटय़ांनी लंपास केले. तर जानुगडे कृषी सेवा केंद्र व मोरया मेडीकल ही दुकाने फोडली, परंतु हाती काही लागले नाही. तर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील अनू ज्वेलर्स, समर्थ कृपा मोबाईल शॉपी, श्री दत्त भेळ सेंटर या तीन दुकानांची शटर्स चोरटय़ांनी फोडली. यामध्ये अनू ज्वेलर्स या दुकानाचे शटर्स फोडण्यात आले. परंतु आत असणाऱया दुसऱया जाळी शटर्समुळे चोरटय़ांना ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश करता आला नाही. तर मोबाईल शॉपीतही मोबाईल किंवा रक्कम हाती लागली नाही. केवळ मोबाईलची रिकामी पाकिटे होती. तर भेळ सेंटरमध्येही काही मिळाले नाही. सकाळी साडेचारच्या सुमारास ही बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच ढेबेवाडी पोलिसांना कळविण्यात आले. यानुसार पोलिसांनी ढेबेवाडीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला.
मिठाईवर मारला ताव
राजस्थान स्वीटस्मधील रोख रक्कमेबरोबरच चोरटय़ांनी मिठाई व कोल्डींक्सवर ताव मारला. तर सोनल क्लॉथ सेंटरमधील रोख रक्कमेबरोबरच जीन्स पॅण्ट पळवून नेल्या. यातील काही पॅन्ट दुकानाच्या बाजूलाच टाकण्यात आल्या.