प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 21 रोजी मतदान होत आहे. 21 जागांपैकी 11 जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. आता 9 मतदार संघातून 10 जागासाठी ही निवडणूक होत आहे. याकरता जिल्ह्यातील 11 ठिकाणी मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रावर 8 कर्मचारी व दोन पोलीस कर्मचारी अशी तयारी करण्यात आली आहे. जे संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्या ठिकाणी ज्यादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या जिल्हा बँकेचे वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, मतदानांसाठी लागणाऱ्या मतपत्रिका, शिक्यासाठी शाई व इतर साहित्यांची तयारी करण्यात आली आहे. तसेच 11 तालुक्यात 11 ठिकाणी मतदान केंद्रे असून मतदान केंद्रावर मतदान केंद्राधिकारी एक व त्यांना सहकार्य करणारे 7 जण असे आठ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन पोलीस कर्मचाऱयांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच संवेदनशील केंद्रे म्हणून पाटण, माण, खटाव, कराड या चार केंद्रामध्ये पोलीस बंदोबस्त ज्यादा ठेवण्यात येणार आहे, असेही निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी माहिती दिली.