नगरपरिषद प्रशासन विभागाचे शिक्कामोर्तब; सातारा पालिकेत 50 नगरसेवक, कराडला 31; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्यास हीच स्थिती
देवदास मुळे / कराड :
राज्यातील 208 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. ओबीसी आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असताना राज्याच्या नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्तांनी जिल्हय़ात निवडणुका होणाऱ्या आठ नगरपालिकांची सदस्यसंख्या निश्चित केली आहे. याबाबतचा आदेश 28 फेब्रुवारीला राजपत्रात प्रसिद्ध झाला. राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा लाभ सर्व पालिकांना झाला असून प्रत्येक शहरात नगरसेवक संख्या वाढली आहे.
राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यातच 2021 सालची जनगणना झालेली नसल्याने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याचा निर्णयही शासनाने घेतला होता. त्यानुसार 28 फेब्रुवारीला जिल्हय़ातील आठ पालिकांची सदस्यसंख्या निश्चित करणारा आदेश राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. नव्याने निश्चित झालेल्या सदस्यसंख्येचा लाभ जिल्हय़ातील सर्व नगरपालिकांना झाल्याचे दिसत आहे. गुरूवारीच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय आला. आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्यास हेच आकडे अंतिम असणार आहेत.
सातारा अ वर्ग : सातारा पालिकेची हद्दवाढ झाली आहे. त्यातच शासनाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याच्या निर्णयाचा लाभ साताऱयाला झाला आहे. सातारा पालिकेत एकूण 50 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. यात एकूण 25 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 6 तर अनुसूचित जमातीसाठी 1 राखीव आहे. अनुसूचित जातीच्या 6 पैकी 3 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्या वजा जाता सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 22 जागा असणार आहेत. तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्यास तब्बल 21 जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत.
कराड ब वर्ग : कराड नगरपालिकेची एकूण निवडून द्यावयाची नगरसेवक संख्या 31 झाली आहे. यात 16 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 4 जागा (पुरूष 2, महिला 2) राखीव आहेत. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 14 जागा असून इतर 13 जागा खुल्या असणार आहेत.
सर्वसाधारण महिलांसाठी 11 जागा
फलटण ब वर्ग : फलटण नगरपालिकेची नगरसेवक संख्या 27 असून यातील 14 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 5 जागा (पुरूष 2, महिला 3) राखीव आहेत. यामुळे सर्वसाधारण महिलांसाठी 11 जागा आहेत. तर 11 जागा खुल्या असणार आहेत.
वाई क वर्ग : वाई नगरपालिकेत 23 जागा असून यातील 12 जागा महिलांसाठी राखीव आहेत. यात अनुसूचित जाती 2 (पुरूष 1, महिला 1), अनुसूचित जमातीसाठी 1 जागा राखीव आहे. सर्वसाधारण महिलांसाठी 11 जागा असून 9 जागा खुल्या असणार आहेत.
सर्वसाधारण महिलांसाठी 9 जागा
महाबळेश्वर क वर्ग : महाबळेश्वर पालिकेत एकूण जागा 20 असून त्यापैकी 10 महिला राखीव आहेत. यात अनुसूचित जातीसाठी 2 जागा (पुरूष 1, महिला 1) राखीव असून अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. त्यामुळे सर्वसाधारण महिलांसाठी 9 जागा असून 8 जागा खुल्या आहेत.
पाचगणी क वर्ग : पाचगणीत 20 जागा असून यातील 10 महिलांसाठी आहेत. यात अनुसूचित जातीसाठी 4 जागा (पुरूष 2, महिला 2) असून सर्वसाधारण महिलांसाठी 8 जागा असणार आहेत. तर 8 जागा खुल्या असणार आहेत.
रहिमतपूर क वर्ग : रहिमतपूरला 20 जागा असून 10 जागा महिलांसाठी राखीव आहेत. यात अनुसूचित जातीसाठी 2 जागा (पुरूष 1, महिला 1) आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी 9 जागा असून 9 जागा खुल्या आहेत.
म्हसवड क वर्ग : म्हसवडमध्ये 20 जागा असून यातील 10 महिला राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 3 जागा (पुरूष 1, महिला 2) राखीव असून सर्वसाधारण महिलेसाठी 8 तर खुल्या प्रवर्गासाठी 9 जागा आहेत.
ओबीसी आरक्षण अडकल्याने खुल्या जागा वाढल्या
स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींचे 27 टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण गृहित न धरता मागासवर्ग आरक्षणासहित सदस्य संख्या निश्चित केली आहे. त्यातच आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची ओबीसी आरक्षणाची याचिका फेटाळल्याने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास याच सदस्य संख्येनुसार निवडणुका होणार आहेत. यामुळे खुला प्रवर्ग व खुल्या महिला प्रवर्गाला लाभ होईल. ओबीसी आरक्षण लागू झाल्यास खुला, महिला खुला प्रवर्गाच्या जागा कमी होतील.
जिल्हय़ातील नगरसेवक
शहर गतवेळी आता
सातारा 40 50
कराड 29 31
वाई 20 23
फलटण 25 27
पाचगणी 17 20
महाबळेश्वर 17 20
रहिमतपूर 17 20
म्हसवड 17 20