अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 30 जून 2021, सकाळी 8.30
● कराड तालुक्यात रूग्णवाढीचा वेग वाढला● जिल्ह्यात गत 24 तासात 804 रूग्णांची वाढ ● 10,687 निकट सहवासितांच्या चाचण्या● जिल्हय़ात 3,078 बेड शिल्लक● एकूण रूग्णवाढ 193,367 वर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा वेग जैसे थे असतानाच कराड तालुक्यात गत सात दिवसात रूग्णवाढीचा वेग वाढला आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात जून महिन्यातील उच्चांकी 286 रूग्णांंची वाढ कराड तालुक्यात झाली असून विशेषतः यामधे ग्रामिण भागातील रूग्णांची संख्या जास्त आहे. सातारा तालुक्यातही तीन अंकी वाढ सुरू असली तरी ती काहीशी आटोक्यात आहे. मात्र कराड तालुका पुन्हा एकदा रूग्णवाढीत धोका पातळीकडे निघाला असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्यामुळे प्रशासनाने लसीकरणाबरोबरच नियम मोडणारांवर कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान बुधवारी आलेल्या अहवालात गत 24 तासात 804 रूग्णांची वाढ झाली आहे. नव्या रूग्णांच्या वाढीने जिल्ह्यात उपचारार्थ रूग्णांची संख्या 10,310 वर पोहचली आहे.
कराडला गर्दीचा फटका बसतोय
जिल्ह्यात कराड, सातारा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात कोरोना रूग्णवाढ नियंत्रणात येताना दिसत आहे. कराड तालुक्यात गत सात दिवसात रूग्णवाढ नेहमीच 200 च्या पुढे राहिली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात रूग्णवाढीत कमालीची वाढ झाली असून 286 नव्या रूग्णांची भर पडली. मृत्यूदरही कमी झालेला नाही. मंगळवारच्या अहवालात 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
नियम फक्त व्हिडीओवर सांगण्यापुरतेच
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा वेग कमी होत नसताना निर्बंधही जैसे थे आहेत. बाजारपेठांमधे, सोहळ्यांमधे गर्दी वाढत असताना लोकप्रतिनिधी, अधिकारी फक्त व्हिडीओ करत सोशल मिडीयावरून नियम पाळण्याचे उपदेश करताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्ष शहरांमधे, ग्रामिण भागात त्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. ना गर्दीच्या ठिकाणी कारवाई होते ना बाजारपेठांमधे कोणी फिरकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नियम सांगून आपली जबाबदारी पार पाडायची आणि प्रत्यक्षात त्याच्या अमलबजावणीचे स्थानिक प्रशासनाने तीनतेरा वाजवायचे असे चित्र सध्या दिसत आहे.
जिल्ह्यात आज लसीकरण नाही?
राज्यात लसीचा साठा शुन्य टक्के उपलब्ध असल्याचा खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सादर केलेल्या जिल्हानिहाय अहवालात सातारा जिल्ह्यात बुधवारी लस उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आज जिल्ह्यात लसीकरण केंद्रांसमोर ‘लस साठा उपलब्ध नाही’ असे फलक पहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्यातच तुटवडा झाल्याने ती केव्हा येईल हे सुद्धा सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 10,66,557, एकूण बाधित 1,93,367, एकूण कोरोनामुक्त 1,79,904, मृत्यू 4,366 , उपचारार्थ रुग्ण 10,310
मंगळवारी जिल्हयात बाधित 804, मुक्त 873, बळी 21