2 लाख 21 हजार 740 जणांचे लसीकरण, कोरोना नियमांचे उल्लंघन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावसह संपूर्ण जिल्हय़ासह राज्यभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. बेळगाव जिल्हय़ामध्ये 2 लाख 21 हजार 740 हून अधिक जणांना शुक्रवारी लस देण्यात आली. सायंकाळी 7 पर्यंत 58.88 टक्के लसीकरण करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासूनच मोहिमेला सुरूवात झाली होती. शहर व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी भेट दिली. याचबरोबर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांना काही सूचना देखील त्यांनी केल्या.
जिल्हय़ामध्ये 3 लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यामध्ये 2 लाख 21 हजार 740 हून अधिक जणांना लस दिल्याची नोंद झाली आहे.
ही आकडेवारी सायंकाळी 7 पर्यंत उपलब्ध झाली. ही मोहीम राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागासह तालुका व गावपातळीवर असलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी कंबर कसली होती. लस मिळणार असल्याने नागरिकांनी सकाळपासूनच अनेक ठिकाणी रांगा लावल्या होत्या.
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. मात्र काही जणांनी स्वतःचे बॅनर उभे करुन श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. जिल्हय़ामध्ये 652 ठिकाणी केंदे सुरू करण्यात आली होती. सकाळच्या टप्प्यामध्ये मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी लस घेतली. पहिला तसेच दुसरा डोस घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. दुपारी 1.30 पर्यंत जवळपास 74 हजार लोकांना लस देण्यात आली. त्यानंतर सायंकाळपर्यंत हा आकडा 2 लाख पार झाला होता.
18 खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरण मोहीम
शहरातील 18 खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या सर्व हॉस्पिटलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 7 नंतरही मोहीम राबविण्यात आली. शहरातील या हॉस्पिटलमध्ये लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याचबरोबर ग्रामीण भागामध्येही लस घेण्यासाठी धडपड सुरू होती. आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या सकाळपासूनच या कामाला लागल्या होत्या.
कोरोनाचे नियम मात्र पायदळी
कोरोना अजूनही गेला नाही. मात्र कोरोनाचे नियम पाळण्याकडे जनतेचे दुर्लक्ष होत आहे. लस घेण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे होते. मात्र अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सच पाळले गेले नाही. काही जणांनी तर तोंडावर मास्क देखील लावले नसल्याचे दिसून आले. यावेळी आशा कार्यकर्त्या तसेच इतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार करत होते.