सर्वाधिक गाळप अथणी शुगर्स केंपवाड कारखान्याकडून : ऊस तोडीचा हंगाम जोमात : तोडणीसाठी मोठय़ा प्रमाणात मशीनचा वापर
प्रतिनिधी /चिकोडी
गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकारने उसाचे बिल एफआरपीनुसार देण्याचा आदेश बजावल्याने ऊस दराची कोंडी काहीअंशी कमी झाली आहे. महाराष्ट्रात अद्यापही एफआरपीपेक्षा वाढीव ऊस दराची मागणी शेतकरी संघटना करीत आहेत. पण यानंतरही सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमात सुरू आहे. सीमावर्ती कर्नाटकातील बेळगाव जिल्हय़ातील 16 कारखान्यांमध्ये 7 नोव्हेंबरअखेर 27 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. ऊसतोड मजुरांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी सर्वच कारखान्यांनी ऊसतोड मशीनचा वापर वाढविला आहे.
महिन्याभरापासून सर्वच कारखान्यांनी गळीत हंगामाला सुरुवात केली आहे. ऊस तोडणीसाठी शेतकऱयांची घाई असल्याने व तोडणीस विलंब झाल्यास इतर कारखान्यांना शेतकरी ऊस देत असल्याने गाळप कमी होवू नये यासाठी सर्वच साखर कारखान्यांनी कमी वेळेत अधिक उसाची तोड करण्यासाठी गाळप क्षमता वाढविण्यासोबत ऊस तोडीसाठी मशीनचा वापर सुरू केला आहे. मजुरांची टंचाई मध्यंतरी जाणवल्याने कारखान्यांनी मशीनचा वापर वाढवून त्यावर मात केली आहे. प्रारंभी साखर कारखान्यांनीच काही मशीन खरेदी करून त्याचा वापर सुरू केला होता. पण आता वाहनधारकांनीच मशीन व ऊस वाहतुकीसाठी ट्रक्टर, ट्रॉलीची सोय केली आहे. शिवाय मशीनने मजुरांच्या कितीतरी पटीने अधिक उसाची तोड लवकर करता येत आहे. सध्या छोटय़ा शेतकऱयांच्या शेतातील ऊस तोडीसाठी मजुरांचा तर मोठय़ा शेतकऱयांच्या शेतातील ऊस तोडीसाठी मशीनचा वापर करण्यात येत आहे.
7 नोव्हेंबर अखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार बेळगाव जिल्हय़ात 16 साखर कारखान्यात मिळून 26 लाख 89 हजार, 556 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 16 लाख 41 हजार 442 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सीमावर्ती कर्नाटकातील मोठय़ा प्रमाणात ऊस महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांना जातो. यंदा पुरामुळे चिकोडी व निपाणी तालुक्मयातील सुमारे 17 हजार हेक्टरातील उसाची पिके नाश झाली आहेत. त्यामुळे गाळप क्षमता वाढविलेल्या साखर कारखान्यांना ऊस अपुरा पडण्याची शक्मयता आहे. ऊस तोड वेळेत न दिल्यास शेतकरी इतर कारखान्यांना ऊस पाठविण्याची शक्मयता असल्याने कारखाने यंदा मशीनचा अधिक वापर करीत आहेत. रासायनिक खतांच्या व मजुरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एफआरपीनुसार देण्यात येणारा दरही कमी पडत आहे. शिवाय ऊस तोडीसाठी वाहनचालकांना प्रतिफेरीस 200 रुपये व मशीन चालकांनाही चहापाण्यासाठी खर्च करावा लागत आहे. ऊस तोडणी मजुरांनाही वरून रक्कम द्यावी लागत आहे.
कारखाना | गाळप ऊस (टनात) | साखर (क्विंटलमध्ये) |
चिदानंद कोरे-चिकोडी | 201850 | 187700 |
शिवशक्ती-यड्राव | 273865 | 248830 |
हालसिद्धनाथ-निपाणी | 65878 | 62530 |
हिरण्यकेशी-संकेश्वर | 106546 | 95000 |
वेंकटेश्वरा-बेडकिहाळ | 114174 | 111100 |
शिरगुप्पी शुगर्स-कागवाड | 144571 | – |
उगार शुगर्स-उगार खुर्द | 212150 | 193700 |
अथणी शुगर्स-केंपवाड | 323550 | 285650 |
कृष्णा शुगर्स-हल्याळ | 87560 | 73590 |
प्रभा शुगर्स-गोकाक | 45350 | 39410 |
रेणुका शुगर्स-मुन्नोळी | 127121 | – |
रेणुका शुगर्स-कोकटनूर | 164926 | – |
रेणुका शुगर्स-रायबाग | 70900 | 33050 |
विश्वराज शुगर्स-बेल्लदबागेवाडी | 129360 | 59645 |
सतीष शुगर्स-हुनश्याळ | 269525 | 203767 |
अरिहंत शुगर्स-जैनापूर | 52050 | 47470 |
एकूण | 2689556 | 1641442 |