धुवाधार वृष्टी : अनेक भागात झाडे उन्मळली : वाहतूक विस्कळीत : वीजपुरवठा खंडित
प्रतिनिधी / ओरोस:
सिंधुदुर्गात मंगळवारी सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला होता. शेती पाण्याखाली गेली असून कुडाळ व परिसरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूचा परिसर जलमय झाला आहे. पावसासोबत काही ठिकाणी झालेल्या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडली असून वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते. बांदा शहरातील आळवाडी बाजारपेठेत मध्यरात्री पुराचे पाणी घुसले. त्यामुळे तेथील व्यापाऱयांची एकच तारांबळ उडाली.
दरम्यान, बुधवारी जिल्हय़ाच्या बहुतेक भागात अति मुसळधार, तर गुरुवार व शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. 4 जुलै रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्हय़ात 112.42 मि. मी. च्या सरासरीने 899.4 मि. मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तर 1 जूनपासून मंगळवारपर्यंत 2810.51 मि. मी. च्या सरासरीने पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर झाडेही उन्मळून पडली. झाराप येथे रस्त्यावर झाड पडून काही काळ वाहतूक ठप्प होती. सावंतवाडी येथील शेखर बावडेकर यांच्या घरावर माड पडल्याने नुकसान झाले. दोडामार्ग-आडाळी रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झाली आहे.