वार्ताहर / सावंतवाडी:
जिल्हा परिषदेच्या सावंतवाडी येथील उपविभागीय बांधकाम विभागातील दोन शाखा अभियंत्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या बदलीमागे नेमपे कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
सावंतवाडीत तालुक्यात तीन अधिकारी आहेत. त्यापैकी उपअभियंतापदी अमोल कारेकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. सावंतवाडी येथील उपअभियंता अमित कल्याणकर यांची तडकाफडकी बदली कुडाळ पंचायत समितीत करण्यात आली आहे. तर शाखा अभियंता सुहास टेमकर यांची दुर्गम अशा वैभववाडी तालुक्यात ब्दली करण्यात आली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी या बदल्या केल्या आहेत. या दोन्ही शाखा अभियंत्यांची एकाचवेळी बदली करण्यामागचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
बांधकाम विभागातर्फे गावागावात सुरू असलेल्या विकासकामांबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर होत्या. त्या पार्श्वभूमीवर या बदल्या झाल्याचे बोलले जात आहे. आता या दोन्ही शाखा अभियंत्यांच्या जागी उपअभियंता म्हणून अमोल कारेकर, कनिष्ठ अभियंता म्हणून ए. एल. गवस, ए. डी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.