प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य सरकारने 7 एप्रिलपर्यंत चित्रपटगृहात 100 टक्के प्रेक्षक प्रवेशाची अट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापाठोपाठ जिममध्येही 50 टक्के प्रवेश देण्याचा आदेश सरकारने दिला आहे. राज्य जीम असोसिएशनने मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याकडे जीममध्येही 50 टक्के प्रवेश देण्याची मागणी केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 50 टक्के प्रवेशाची मुभा दिली आहे.
जीममध्ये 50 टक्के प्रवेश देण्याची मार्गसूची सरकारने जारी केली आहे. तसेच जीममध्ये कोरोना नियमांचे पालन करा. दररोज जीममध्ये सॅनिटायझर फवारणी करावी, अशा विविध सूचना करण्यात आल्या आहेत. सरकारने दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे 2 एप्रिल रोजी नवी मार्गसूची जारी केली होती. त्यानुसार जीम, स्विमिंगपूल बंद करण्याचा आदेश दिला होता. पण रविवारी जीममध्ये 50 टक्के प्रवेश देण्याचा आदेश दिला आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास जीम पुन्हा बंद करण्यात येतील, असा इशारा राज्याच्या मुख्य कार्यदर्शींनी दिला आहे.