प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील देशभरात अनलॉक-3 मार्गसूची जारी करण्यात आली आहे. त्यानुसार जीम, योगा केंद्रे, फिटनेस सेंटर सुरू करण्यासंबंधी केंद्राने मार्गसूची जारी केली होती. आता राज्य सरकारनेदेखील 13 मुद्यांच्या समावेशाची मार्गसूची जारी केली आहे.
राज्य सरकारने कंटेन्मेंट झोनमधील जीम, फिटनेस सेंटर सुरू करण्यास निर्बंध घातले आहेत. उर्वरित भागात जीम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जीममध्ये येणाऱयांची माहिती नमूद करावी. प्रत्येक जीम, फिटनेस सेंटरमध्ये स्क्रिनिंग तपासणी, मास्क, सॅनिटायझरची सक्ती राहणार आहे. ताप, सर्दी आणि खोकला असणाऱयांना जीममध्ये प्रवेश देऊ नये, अशी सूचना मार्गसूचीद्वारे करण्यात आली आहे.
शिवाय 10 वर्षाखालील मुले, 65 वर्षांवरील व्यक्तींनादेखील आतमध्ये प्रवेश देऊ नये. जीममध्ये येणाऱयांचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आगमन-निर्गमनाची वेळ नोंद दोन वेगवेगळय़ा ठिकाणी नोंद करावी. जीममध्ये येणारी व्यक्ती आरोग्य सेतू ऍपचा वापर करते का, याची पडताळणी करावी. व्यायाम करताना किमान सहा फूट अंतर राखावे. प्रत्येकाला पेपर टॉवेलचा पुरवठा करावा. त्याचप्रमाणे कॅशलेश व्यवहार करण्यावर भर द्यावा, अशा सूचना देखील मार्गसूचीमध्ये करण्यात आल्या आहेत.