सोनुर्ली येथे आंबा बागेत कारवाई : दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
वार्ताहर / न्हावेली:
जिल्हय़ात सर्वत्र संचारबंदी असताना सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील आंबा बागेत जुगार खेळताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व स्थानिक पोलिसांनी छापा टाकून जुगार साहित्यासह अकराजणांना ताब्यात घेतले. पाच दुचाकी, रोख रक्कम नऊ हजार असा एकूण 1 लाख 99 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आली. यामध्ये काहीजण फरार झाले आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
धर्माजी तुकाराम मसुरकर (72, न्हावेली), नितीन नामदेव सावंत (25, तळवडे-बादेवाडी), रवींद्र अंकुश हरमलकर (42, मळगाव), जयेंद्र परशुराम साळगावकर (50, सोनुर्ली), आनंद राजाराम नाईक (45, सोनुर्ली), दत्तप्रसाद नामदेव कवठणकर (31, कवठणी), सुहास सुरेश सावंत (21, तळवडे), अजित गोपाळ सावंत (52, निरवडे), विष्णू पांडुरंग म्हापणकर (39, नेमळे), गंगेश्वर श्रीधर कोचरेकर (न्हावेली), गोविंद महादेव साळगावकर (सोनुर्ली) अशी संशयितांची नावे आहेत. या अकराजणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात जुगार ऍक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांनी दिली.
सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील पेडणेकर यांच्या आंबा बागेत काही तरुण अंदर-बाहेर तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार गुन्हा अन्वेषण विभाग पथकाचे उपनिरीक्षक सचिन शेळके यांच्या नेतृत्वाखाली सुधीर सावंत, अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर गंगावणे, अमित पालकर, जयेश सरमळकर तसेच शरद लोहकरे यांच्या पथकाने कारवाई करीत अकराजणांना ताब्यात घेतले. काहीजण फरार झाले. जुगार साहित्यासह पाच दुचाकी, रोख रक्कम नऊ हजार 90 रुपये असा 1 लाख 99 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकराजणांवर गुन्हे दाखल करून नोटिसा बजावण्यात आल्या. फरार असलेल्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती लोहकरे यांनी दिली.
संचारबंदी कालावधीत अवैध दारू वाहतूक, विक्री, जुगार यांचा सुळसुळाट वाढला आहे. पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी अवैध दारुधंदे व जुगारावर कडक कारवाईचे आदेश केल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.