वृत्तसंस्था/ मेलबर्न
सोमवारपासून येथे 2022 टेनिस हंगामातील ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. पुरूष विभागात सर्बियाचा 34 वर्षीय टॉप सीडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविच सहभागी होणार नसल्याने स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नदाल आणि रशियाचा मेदव्हेदेव यांचा जेतेपदाचा मार्ग सुकर झाला आहे.
सर्बियाचा जोकोविच याने या स्पर्धेपूर्वी कोरोनाची लस घेतली नसल्याने त्याला या स्पर्धेत कोरोना नियमावलीमुळे निर्बंध घालण्यात आले. तसेच त्याचा व्हिसाही रद्द करण्यात आला. आतापर्यंत 20 वेळा ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया जोकोविचला यावेळी मात्र या स्पर्धेचे जेतेपद स्वतःकडे राखता येणार नाही. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत गेल्या अकरा वर्षांच्या कालावधीत जोकोविचने नऊवेळा अजिंक्यपद पटकाविले आहे. जोकोविचची गैरहजेरी स्पेनच्या नदाल आणि रशियाच्या मेदव्हेदेवला फायदेशीर ठरू शकेल. नदालने आतापर्यंत 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून त्याला यावेळी या स्पर्धेत विक्रमी 21 वे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्वीसचा अनुभवी रॉजर फेडरर दुखापतीमुळे सहभागी होणार नाही जोकोविचला शेवटच्याक्षणी या स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याने ऑलिंपिक चॅम्पियन जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह आणि ग्रीकचा चौथा मानांकित सिटसिपेस यांना यावेळी पहिले ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविण्याची संधी आहे.
सोमवारी या स्पर्धेत 35 वर्षीय नदालचा सलामीचा सामना अमेरिकेच्या गिरॉनशी होणार आहे. नदालने आतापर्यंत 13 वेळा प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे पण अलिकडे वारंवार दुखापतीमुळे नदालला टेनिसपासून अलिप्त रहावे लागले आहे. रशियाचा मेदव्हेदेवचा सलामीचा सामना मंगळवारी स्वीसच्या लेकसोनेनशी होणार आहे. ब्रिटनच्या माजी टॉप सीडेड अँडी मरेला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. त्याचा सलामीचा सामना बॅसिलासेव्हेलीशी होणार आहे. जोकोविचने सलग तीनवेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. तो या स्पर्धेतील विद्यमान विजेता असला तरी त्याला यावेळी जेतेपद स्वतःकडे राखता येणार नाही.
जोकोविचला कोरोना लस न घेतल्याने तसेच त्याचा व्हिसा रद्द झाल्याने यावेळी ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सहभागी होण्यास निर्बंध घालण्यात आले. जोकोविचने ऑस्ट्रेलियन शासनाच्या या निर्णयाविरूद्ध न्यायालयात दाद मागितली पण ऑस्ट्रेलियाच्या संबंधित खात्याच्या मंत्र्याला जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचा निर्णय येथील फेडरल कोर्टच्या न्यायाधीशानी एकमताने दिल्याने जोकोविचला माघारी परतावे लागले आहे.