प्रतिनिधी / बेंगळूर
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि गांधीवादी नेते, एच. एस. दोरेस्वामी (वय 104) यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. उपचारासाठी काही दिवसांपूर्वी त्यांना बेंगळूरच्या जयदेव इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कोविड मार्गसूचीनुसार सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोरेस्वामी यांना हृदयविकार, तीव्र रक्तदाब, श्वसननलिकेत दाह आदी विकार होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सात दिवसांच्या उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले होते. मात्र, अचानक त्यांची तब्येत खालावल्याने 12 दिवसांपूर्वी जयदेव इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग झाला नाही. कोविड मार्गसूचीनुसार वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले. चामराजपेठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातून शोक व्यक्त येत आहे.
एच. एस. दोरेस्वामी यांचा जन्म 10 एप्रिल 1918 रोजी जन्म कनकपूर तालुक्यातील हारोहळ्ळी येथे झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बेंगळूरमधील माध्यमिक शाळेत गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून सेवा बजावली. ब्रिटीश काळात लोकप्रिय ठरलेल्या ‘पौरवाणी’ या साप्ताहिकाचे पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले होते. स्वातंत्र्यलढय़ातील ‘चले जाव’ चळवळ, गोवा मुक्ती चळवळीतही ते सहभागी झाले होते. गांधीवादी विचारांचा पगडा असल्यामुळे ते शेतकरी, कामगार व विविध समाजघटकांच्या न्यायासाठी आंदोलनात सहभागी होत होते.