दम्यासाठीचे आयुर्वेदिक औषध यंदा नाही
वार्ताहर / किणये
दरवषी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर झाडशहापूर येथे दम्याच्या रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषध देण्यात येते. यंदा कोरोना असल्यामुळे शिबिर रद्द करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झाडशहापूर येथील कै. यल्लाप्पा नंदिहळ्ळी हे दम्याच्या रुग्णांना आयुर्वेदिक औषध देत होते. त्यानंतर काही वर्षांपासून त्यांची कन्या पूजा सूर्यवंशी या औषध देत आहेत.
पूजा सूर्यवंशी यांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवली आहे. यंदाही मृग नक्षत्राला आयुर्वेदिक औषध देण्याचे त्यांनी ठरविले होते. मात्र, त्या सध्या नाशिक येथे राहतात. सध्या बेळगावमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने प्रशासनाच्या नियमांचे पालन करून गर्दी टाळण्यासाठी यंदाचे शिबिर रद्द करण्यात आले असल्याची माहिती पूजा सूर्यवंशी यांनी दिली.
दरवषी मृग नक्षत्राच्या आदल्या दिवशी व मृग नक्षत्रादिवशी असे दोन दिवस हे औषध देण्यात येते. यंदाही दि. 7 व 8 रोजी दम्यासाठी आयुर्वेदिक औषध देण्याचे शिबिर आयोजित केले होते. मात्र, कोरोनामुळे यंदा दमा रुग्णांना औषध मिळणार नसून हे शिबिर रद्द केले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे पूजा यांनी सांगितले.