प्रतिनिधी / सातारा :
कोरोना काळात शाळा बंद असल्याने डिजीटल तंत्रज्ञानाचे महत्व शिक्षण क्षेत्रात वाढू लागले. यापुर्वीच सातारा जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांमध्ये स्मार्ट शाळा हा उपक्रम राबवण्यास प्रारंभ केलेला आहे. त्यामुळे बहुतांशी शहरालगतच्या शाळांमध्ये स्मार्ट स्कूल या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. आता जिल्ह्यातील नव्याने 319 शाळांना स्मार्ट टीव्ही तर 235 शाळांना संगणक देण्यात आले. सर्व शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण शैक्षणिक विकास साधणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरु आहेत, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शाळांना स्मार्ट टीव्ही व संगणकांचे वाटप जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्यासह शिक्षक संघटनेचे नेते व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जगदाळे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण कसे देता येईल, यासाठी माझ्या कटाक्षाने सुचना आहेत. प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी कटाक्षाने लक्ष देण्याकरता वारंवार मार्गदर्शित केले गेले आहे. प्रत्येक तालुक्यातील शाळांमधील मुलांना कोरोना काळातही शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने स्मार्ट टीव्ही आणि संगणक ज्या शाळांचा पट 50 हून अधिक आहे. त्या शाळांना सुविधा दिल्या गेल्या आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये सातारा जिल्हा परिषदेचा लोगो सुरुवातीला येतो आहे. त्यामध्ये सर्व शैक्षणिक ॲप्स भरलेले आहेत. त्या ॲप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्यावत असे शिक्षण मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.