सातारा : सातारा जिल्हा परिषदमध्ये विविध विभागांच्या मिळून प्रशासकीय, विनंती आणि आपसी अशा तिन्ही प्रकारांमध्ये एकूण 72 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव उपस्थित होते. 26 जुलै आणि 27 जुलै अशा दोन दिवसांमध्ये या बदल्या काटेकोरपणे, शासकीय नियमानुसार आणि निर्देशानुसार करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ही बदली प्रक्रिया शांततेत पार पडली. सामान्य प्रशासन विभागात सहाय्यक प्रशासन अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक प्रशासन, कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अशा एकूण 26 जणांच्या बदल्या करण्यात आल्या. ग्रामपंचायत विभागामध्ये विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक या दोन वर्गामध्ये एकूण सात जणांच्या बदल्या झाल्या. प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी पदांमध्ये चार बदल्या झाल्या तर आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक पुरुष आणि आरोग्य सेवक पुरुष अशा तीन संवर्ग मध्ये एकूण तीन बदल्या करण्यात आल्या. अशा पद्धतीने 27 जुलै रोजी एकूण 40 बदल्या करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तर त्या अगोदर 26 जुलै रोजी एकूण बत्तीस जणांच्या बदल्या झाल्या. यामध्ये अर्थ विभागातील सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ सहाय्यक लेखा या चार पदांमध्ये एकूण सात बदल्या झाल्या तर पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक इत्यादी पदांसाठी सहा जणांच्या तर कृषी विभागात कृषी अधिकारी आणि विस्तार अधिकारी पदांसाठी तीन जणांच्या बदल्या करण्यात आल्या.
बांधकाम विभागाअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता या पदांमध्ये सहा जणांच्या तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 10 अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या बदल्या करण्यात आल्या. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे आणि शासकीय निर्देशानुसार काटेकोरपणे राबविण्यात आली.