नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टाइम्स समूहाच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे नुकतेच दिल्ली येथे निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. इंदू जैन यांना कोरोनाची बाधा झाली होती. मागील काही दिवसांपासून त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्यांच्या तब्येतीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याने त्यांनी गुरुवार, 13 मे रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच देशाच्या राजकीय आणि पत्रकारिता वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला.
टाइम्स समूहाच्या अध्यक्षा इंदू जैन यांना त्यांच्या कार्यासाठी 2016 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते. त्या भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्षाही होत्या. त्यांनी टाइम्स फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या असंख्य नागरिकांना वेळोवेळी मदत दिली. टाइम्स रिलीफ फंडाच्या माध्यमातून त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे रस्त्यावर आलेल्या असंख्य नागरिकांना आधार दिला होता. उत्तम कार्यासाठी दान करणे, कलेचे रक्षण करणे आणि महिला अधिकारांसाठी सजग असणे ही त्यांच्या जीवनाची तीन प्रमुख वैशिष्टय़े होती.