लक्ष्मी मार्केटमधील गाळय़ांचा लिलाव दुसऱयांदा रद्द
प्रतिनिधी / बेळगाव
महात्मा फुले मार्केटमधील गाळय़ांबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याने लिलाव रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. पण न्यायालयाची स्थगिती नसल्याने लिलाव प्रक्रिया राबवून गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले. पण खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केटमधील 39 गाळे भाडेतत्त्वावर देण्याच्या लिलाव प्रक्रियेस न्यायालयाची स्थगिती असल्याने मनपाने आयोजित केलेली लिलाव प्रक्रिया दुसऱयांदा रद्द करण्याची वेळ मनपावर आली आहे.
मनपाच्या गाळय़ांच्या माध्यमातून महसूल वाढविण्यासाठी गाळे भाडेतत्त्वावर देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. पण काही ठिकाणी न्यायालयीन वाद आणि जागेच्या मालकीचा वाद निर्माण होत आहे. महात्मा फुले भाजी मार्केटबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी करून लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यास न्यायालयाची स्थगिती नसल्याने मनपाने लिलाव प्रक्रिया राबवून गाळे भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. महात्मा फुले भाजी मार्केटबाबत सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने गाळेधारकांची याचिका फेटाळली आहे. मात्र, खंजर गल्ली परिसरातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यास न्यायालयाची स्थगिती असल्याने लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केटच्या जागेत स्क्रॅपची दुकाने होती. या ठिकाणी असलेली खुली जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. सदर जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न महापालिकेने केला होता. मात्र, येथील व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतल्याने महापालिकेला ताबा घेता आला नव्हता. मात्र, मनपाच्या खुल्या जागा ताब्यात घेण्याची मोहीम महापालिकेने तत्कालीन आयुक्त रविकुमार यांच्या कारकिर्दीत राबविली होती. त्यावेळी खंजर गल्ली जागेवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर भाडेतत्त्वावर देण्यासाठी गाळे बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी वाहनांकरिता पार्किंग तळ उभारण्यात आले आहे. पार्किंग तळ सुरू करण्यासह येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली चालविल्या आहेत. गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. दि. 8 रोजी 39 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी दुसऱयांदा लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. लिलाव प्रक्रियेला न्यायालयाची अडचण निर्माण झाल्याने मागील वेळी लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. या न्यायालयीन वादाबाबतचा निर्णय होण्यापूर्वीच महसूल विभागाने पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविली आहे. ऑक्टोबर महिन्यात स्थानिक न्यायालयाकडून मनपाला नोटीस बजावण्यात आली असून दि. 31 जानेवारी रोजी हरकत दाखल करण्याची सूचना केली आहे. न्यायालयाची सुनावणी होईपर्यंत गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येऊ नयेत, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.