प्रतिनिधी / बेळगाव
श्री स्पोर्ट्स क्लब खडक गल्ली आयोजित श्री चषक प्रदर्शनीय क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात टिळकवाडी पोलीस स्थानक संघाने बेळगाव लिजंड संघाचा 7 धावानी पराभव करून विजेतेपद पटकाविले. महंमद यांना सामनावीर तर चिन्नप्पा (पोलीस) यांना मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सकाळी आमदार अनिल बेनके, मल्लीकार्जुन जगजंपी, वैभव जाधव, रोहन जवळी, अमित कुडतुडकर, दत्ता कणबर्गी यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या उपांत्य सामन्यात टिळकवाडी पोलीस संघाने हेस्कॉम संघाचा पराभव केला. पोलीस संघाने 8 षटकात 5 बाद 70 धावा केल्या. त्यात चन्नाप्पाने 45 धावा केल्या. हेस्कॉमतर्फे सिद्धुने 2 तर संतोषने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हेस्कॉमने 8 षटकात 7 बाद 57 धावाच केल्या. दुसऱया सामन्यात बेळगाव लिजंड संघाने पत्रकार संघाचा 6 गडय़ानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात टिळकवाडी पोलीस संघाने 8 षटकात 7 बाद 72 धावा केल्या. सय्यदने 34, महंमदने 12 धावा केल्या. बेळगाव लिजंडतर्फे युवराज पाटील व अनिल बैलूर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल बेळगाव लिजंडने 8 षटकात 7 बाद 65 धावाच केल्या. त्यात गजानन काजोळकरने 27 तर शिवाजी जाधवने 10 धावा केल्या. पोलीसतफें महंमद व चिन्नाप्पा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे आ. अनिल बेनके, मल्लिकार्जुन जगजंपी व शिवाजी जाधव यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री स्पोर्ट्स निमंत्रितांच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेच्या चषकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.