वृत्तसंस्था/ मुंबई
टी-20 विश्वचषक आणि आयपीएल या दोन्ही स्पर्धेत खेळण्याची इच्छा भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने व्यक्त केली आहे. कोरोना महामारी संकटामुळे या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांचे भवितव्य अद्याप अनिश्चितच आहे.
गेल्या मार्चमध्ये नियोजित असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा कोरोना संकटामुळे आयोजकांनी बेमुदत लांबणीवर टाकली. त्यामुळे सदर स्पर्धा दुसऱया देशात भरविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 2020 च्या क्रिकेट हंगामात टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि आयपीएल स्पर्धेत खेळण्याची आपली इच्छा होती पण आयपीएल स्पर्धेचे भवितव्य निश्चित नसल्याने आता या दोनपैकी एका स्पर्धेत खेळण्याची आपल्याला संधी मिळू शकेल, असे प्रतिपादन रोहित शर्माने केले आहे.
आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात घेतली जाणार आहे. आता या स्पर्धेचे भवितव्य आयसीसी ठरवेल पण गेल्या काही वर्षांमध्ये सलग होत असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे भवितव्य मात्र अनिश्चित वाटते. बीसीसीआयने सदर स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे. आयसीसीने विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला तर त्या कालावधीत आयपीएल स्पर्धा भरविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चारवेळा विजेतेपद मिळविले आहे. चालू वर्षांच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये चार कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर 3 डिसेंबरपासून तर ऍडलेड ओव्हल येथे दुसरी कसोटी दिवस-रात्रीची खेळविली जाणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱया या कसोटीत गुलाबी चेंडू वापरला जाणार असून हे आपल्यासमोर नवे आव्हान ठरणार असल्याचे शर्माने म्हटले आहे. आयपीएल आणि टी-20 विश्वचषक या दोन्ही स्पर्धांत खेळण्याची माझी इच्छा आहे पण प्रत्यक्षात त्याची पुर्तता होणे अवघड असल्याचे शर्माने म्हटले आहे. भारताचा माजी कर्णधार महिंद्रसिंग धोनीच्या कामगिरीबाबत बोलताना रोहितने ‘लिजेंड’ हा एकमेव शब्द शर्माने वापरला. इंग्लंडच्या जेसन रॉयची तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची फलंदाजी पाहताना मला अधिक आनंद मिळतो, असेही शर्माने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी बोलताना सांगितले.