अनंतनाग, श्रीनगरसमवेत अनेक ठिकाणी एनआयएचे छापे – जणांना अटक
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग समवेत अनेक ठिकाणी रविवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापे टाकले आहेत. ही कारवाई टेरर फंडिंगशी (दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा) संबंधित प्रकरणांवरून करण्यात आली आहे. काश्मीर खोऱयात इस्लामिक स्टेटला वित्तपुरवठा तर केला जात नाही ना याचा शोध घेण्याचा प्रयत्न एनआयए करत आहे.
अनंतनागमधील 4 तर श्रीनगरमधील एका ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत. आतापर्यंत याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून यात एका 36 वर्षीय महिलेचा समावेश आहे. एनआयएच्या छापेमारीत जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवानही सामील आहेत. याप्रकरणी आणखीन काही जणांना अटक होऊ शकते.
चिनी ग्रेनेड हस्तगत
एनआयएने अनंतनागसह बारामुल्ला आणि श्रीनगरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून चिनी ग्रेनेड आणि 48 हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. एनआयएने रविवारी सकाळी दारुल उलूम, दलाल मोहल्ला, नवाबाजारमध्ये पोलीस, एसओजी, एसडीपीओच्या अनेक अधिकाऱयांसोबत छाप्याची कारवाई केली आहे. यादमयान काही दस्तऐवज तसेच एक लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला. तसेच अदनान अहमद नदवीला अटक करण्यात आली आहे.
11 कर्मचारी बडतर्फ
तत्पूर्वी जम्मू-काश्मीर प्रशासनाने शनिवारी दहशतवादी संघटनांना मदत केल्याच्या आरोपाखाली हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सलाहुद्दीनचे दोन्ही पुत्र आणि दोन पोलिसांसह 11 कर्मचाऱयांना बडतर्फ केले होते. हिजबुल म्होरक्याचे पुत्र सैयद अहमद शकील आणि शाहिद युसूफ यांनाही टेरर फंडिंगमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आले आहे. दोघेही सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती दहशतवादी संघटनांना पुरवत होते.