वृत्तसंस्था/ टोकियो
सध्या येथे सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवेळी शुक्रवारी कोरोनाचे 27 नवे रुग्ण आढळल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये तीन ऍथलिट्सचा समावेश आहे.
23 जुलैपासून या स्पर्धेला प्रारंभ झाल्यानंतर प्रत्येक दिवशी सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी नियमिपणे घेतली जात आहे. गुरुवारी कोरोना चाचणीत 27 व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यामध्ये अमेरिकन पोलव्हॉल्टर सॅम केन्ड्रीक्सचा समावेश आहे. कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह ठरल्याने केन्ड्रीक्सला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याने यापूर्वी दोनवेळा पोलक्हॉल्ट प्रकारात विश्वविजेतेपद मिळविले आहे. गेल्या आठ दिवसांच्या कालावधीतील ऑलिम्पिक क्रीडाधाममध्ये गुरुवारचा कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत 220 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामध्ये जपानच्या 18 नागरिकांचा तसेच विदेशातील 9 व्यक्तींचा समावेश आहे. टोकियो शहरामध्ये 3 हजार 865 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याचे स्पर्धा आयोजकांनी जाहीर केले आहे.