हेटेरो ग्रुपकडून औषध विकसित – प्रौढांवरील कोरोनाच्या उपचारात मिळणार मदत
वृत्तसंस्था / हैदराबाद
हेटेरो या औषध कंपनीच्या औषधाला प्रौढांमध्ये कोरोनावरील उपचारासाठी आपत्कालीन वापराची अनुमती मिळाली आहे. हेटेरो कंपनीने सोमवारी यासंबंधी घोषणा केली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) प्रौढांमध्ये कोरोनावरील उपचारासाठी भारतात टोसीलिजुमॅबच्या जेनेरिक आवृत्तीसाठी आपत्कालीन वापर प्राधिकरणाला (इयूए) मंजुरी दिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
डॉक्टर रुग्णालयात दाखल प्रौढांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी जेनेरिक औषध टोसीलिजुमॅबचा वापर करू शकणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. भारतात हेटेरोच्या टोसीलिजुमॅबला मिळालेल्या अनुमतीमुळे आनंदी आहे. आमच्या तांत्रिक क्षमता आणि कोव्हिड देखभालीसाठी महत्त्वपूर्ण वैद्यकीय व्यवस्था करण्याची प्रतिबद्धता यातून प्रदर्शित होते. टोसीलिजुमॅबच्या भारतातील पुरवठा सुरक्षेसाठी ही मंजुरी अत्यंत महत्त्वाची आहे. समान वितरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सरकारसोबत मिळून काम करू असे उद्गार हेटेरो समुहाचे अध्यक्ष डॉ. बी. पार्थ सारथी रेड्डी यांनी काढले आहेत.
हेटेरोज टोसिराचे (टोसीलिजुमॅब) विपणन त्याची सहकारी कंपनी हेटेरो हेल्थकेअरकडून भारतात केले जाणार आहे. हेटेरोची बायोलॉजिक्स शाखा हेटेरो बायोफार्मा हैदराबादच्या जडचेरला येथील स्वतःच्या केंद्रात औषधाची निर्मिती करणार आहे.