ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत प्रजासत्ताक दिनादिवशी निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यास त्याला केंद्र सरकार जबाबदार असेल, असा धमकीवजा इशारा सिख फॉर जस्टीस संघटनेचे दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू यांच्याकडून देण्यात आला आहे.
भारतात सिख फॉर जस्टीस संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेचा म्होरक्या पन्नू याने 13477934761 या नंबरवरून सीआयएसएफच्या कंट्रोल रुमला फोन करून हा इशारा दिला आहे. या फोननंतर दिल्ली पोलीस आणि गुप्तहेर संघटना सतर्क झाल्या आहेत.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला पोलिसांची परवानगी मिळाली असून, रॅलीचा मार्गही ठरला आहे. जवळपास 12 हजार ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात येते. रॅलीत शेतकऱ्यांना सोबत कोणतेही शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका शार्प शूटरला शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.