चीनविषयक तज्ञ अशी ओळख : अजित डोवाल यांना करणार रिपोर्ट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यात सीमांवरून सुरू असलेल्या वादादरम्यान चीनविषयक तज्ञ म्हणून ओळखले जाणारे विक्रम मिसरी यांना राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात तैनात करण्यात आले आहे. मिसरी हे यापूर्वी बीजिंगमध्ये भारताचे राजदूत राहिले आहेत. मिसरी यांना डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायजर (एनएसए) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मिसरी हे 1989 च्या तुकडीचे आयएफएस अधिकारी आहेत. 31 डिसेंबर रोजी पंकज सरन सेवानिवृत्त झाल्यावर मिसरी त्यांची जागा घेणार आहेत. विक्रम मिसरी यांनी पंतप्रधान कार्यालयात देखील काम केले आहे. डेप्युटी एनएसए झाल्यावर ते आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना रिपोर्ट करणार आहेत. मिसरी यांच्यासह राजेंद्र खन्ना आणि दत्ता पडसलगीकर देखील या पदावर तैनात आहेत.
रशियात भारताचे राजदूत राहिलेले पंकज सरन हे 31 डिसेंबर 2021 रोजी निवृत्त होणार आहेत. नव्या डेप्युटी एनएसएना हिंद-प्रशांतमधील सामरिक विषयांचा चांगला जाणकार मानले जाते.