पती गजाआड, कराड तालुक्यातील मनव येथील घटना
प्रतिनिधी / कराड उंडाळे
पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याचे घाव घालून पतीने तिचा निर्घृण खून केल्याची घटना मनव (ता. कराड) येथे बुधवारी रात्री घडली. ऊस तोडणीच्या कारणावरून खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या प्रकरणी ऊसतोड मजुरास कराड तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सारिका लाला डावरे (वय 29) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. संशयित लाला शहाजी डावरे (वय 34, सध्या रा. मनव, ता. कराड, मुळ रा. गिरवली, ता. भूम, जि. उस्मानाबाद) याला अटक केली. आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऊसतोडीसाठी गिरवली (जि. उस्मानाबाद) येथून ऊस तोड कामगार कराड तालुक्यात आले आहेत. काहीजण मनव येथे थांबले आहेत. या कामगारांपैकी सारिका डावरे व लाला डावरे या पती-पत्नीमध्ये बुधवार रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भांडण लागले. त्यांच्यामध्ये गेली दोन-तीन दिवसांपासून गावातील पाटलांचा ऊस तोडण्याच्या कारणावरून वाद होता. त्याच कारणावरून बुधवारी रात्री पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी पती लाला डावरे यांने लाकडी दांडके पत्नी सारिका डावरे यांच्या डोक्यात घातले. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. सारिका यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने इतर ऊस तोडणी कामगार तेथे आले. तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. इतर ऊसतोड मजुरांनी त्यांना उपचारासाठी त्वरित कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलविले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याबाबतची खबर पोलीस पाटील अनिता कृष्णा पोळ यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, धनू कोळी हे घटनास्थळी पोहोचले. संशयित लाला डावरे याला पोलिसांनी याला ताब्यात घेऊन अटक केली. डीवायएसपी सुरज गुरव यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड करत आहेत.