प्रतिनिधी/ रत्नागिरी
दोन महिने उलटून गेले तरी तत्कालीन सिव्हील सर्जन डॉ.अशोक बोल्डे यांनी शासकीय निवासस्थान किल्ली अद्यापही जमा केलेली नाही. मुळात त्यांचे कुटुंबिय वगैरे येथे राहत नसताना ते निवासस्थान किल्ली का जमा करत नाही, ते जमा करावी म्हणून जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून आतापर्यंत चारवेळा नोटीस बजावण्यात आल्या आहेत मात्र अद्यापही त्यांनी उत्तर दिलेले नाही तसेच आता बांधकाम विभागाकडूनही निवासस्थान सोडण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे.
काही कौटुंबिक किंवा इतर अडचण असेल तर शासकीय निवासस्थान काही कालावधीसाठी वाढवून देण्यात येते मात्र कोणतेही कारण न देता गेली दोन महिने डॉ.बोल्डे यांनी शासकीय निवासस्थान सोडले नाही. त्यामुळे सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.फुले यांना शासकीय निवासस्थान मिळण्यात अडचणी निर्माण होत आहे. हे निवासस्थान नातेवाईकांना वापरण्यासाठी दिली जाते त्यामुळे या निवासस्थानाचा पर्यटन स्थळाचा वापर केला जात असल्याची माहितीही कर्मचारी वर्गाकडून समोर आली आहे.
बांधकाम विभागाच्या नोटीसनंतर तरी तत्कालीन सिव्हील सर्जन डॉ.बोल्डे उत्तर देणार का? की बांधकाम विभागावर कुलुप तोडण्याची वेळ येणार? याबाबत आता सिव्हीलच्या वैद्यकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.