उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास जि. प. सदस्या भाग्यश्री मोहिते यांचा आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / नागठाणे
नागठाणे (ता.सातारा) येथे बांधण्यात आलेल्या नवीन व्यापारी गाळ्यांच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला असून ग्रामसेवक सचिन पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीशी संगनमत करून हा भ्रष्टाचार केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा सातारा जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा नागठाणे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री संजय मोहिते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की नागठाणे येथे बांधण्यात आलेल्या नवीन व्यापारी गाळ्यांचे बांधकाम हे बेकायदेशीर असून त्यांच्या कामाची कोणतीही निविदा काढण्यात आली नाही. या बांधकामाबाबत जिल्हा परिषदेची तांत्रिक मान्यताही घेतली नाही. सक्षम अधिकाऱ्यांकडून कोणतेही आर. सी. सी डिझाइन केली नाही. या गाळ्यांच्या बांधकामासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये लोकवर्गणी घेऊन ती रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा केली नाही. संबंधितांना ग्रामपंचायतीची सात नंबरची पावतीही दिली नाही.
या गाळ्यांच्या बांधकामांबाबत ग्रामसेवक सचिन पवार यांना लेखी माहिती मागूनही ती देण्यास टाळाटाळ केली. जिल्हा परिषदेला याबाबत तक्रार करूनही त्यांच्याकडून कोणतीच कारवाई करण्यात न येता फक्त टाळाटाळच होत आहे. ग्रामसेवकाने स्थानिक लोकप्रतिनिधीला हाताशी धरून संगनमताने मोठा आर्थिक भ्रष्टाचार केला असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा न्याय मिळेपर्यंत जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.