जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजन : जिल्हा नशाबंदी मंडळाचा उपक्रम
प्रतिनिधी / कणकवली:
नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग विभागातर्फे नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक, सामाजिक कार्यकर्त्या अर्पिता मुंबरकर यांच्या संकल्पनेतून जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सोशल मीडियावर तंबाखूमुक्तीची लाईव्ह शपथ तरुणाईला देण्यात आली.
नशाबंदी मंडळातर्फे विविध उपक्रमांद्वारे दारू, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच अंमली पदार्थाचे सेवन व त्याचे दुष्परिणाम याविषयी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात येते. निकोटीन व तंबाखूच्या व्यसनांना प्रतिबंध करणे यावर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे. अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूहाने युवा पिढीला तंबाखू सेवनाकडे आकर्षित करण्यासाठी विविध जाहिराती देऊन आपल्या विळख्यात ओढले आहे. यामुळे युवावर्ग मोठय़ा प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जात आहे. भारतात दर दिवशी 2500 तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या आहे. यात 18 ते 35 वयोगटातील तरुणांचा समावेश जास्त आहे ही खूप चिंताजनक बाब आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गुटखा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन रस्त्यावर थुंकल्यास ही थुंकी कोरोना आजाराच्या प्रसाराला पूरक ठरू शकते. कोरोनाच्या काळात समूहाने एकत्र येण्याला प्रतिबंध लक्षात घेऊन तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत प्रचार, प्रसाराचे सोशल मीडियाच्या प्रभावी माध्यमातून मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. या सगळय़ा पार्श्वभूमीवर अर्पिता मुंबरकर यांनी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सोशल मीडियावर तंबाखू मुक्तीची लाईव्ह शपथ तरुणाईला देऊन तरुणाईला या व्यसनापासून दूर राहण्याचेही आवाहन केले.
या उपक्रमासाठी नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, राज्य संघटक अमोल माडामे यांचेही सहकार्य लाभल्याचे सौ. मुंबरकर यांनी सांगितले.