सातारा / प्रतिनिधी:
जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणासाठी होणारी गर्दी पाहता तरुण भारत चा मागणी आणि पाठपुराव्या नंतर आज पासून सेंट पॉल स्कूल या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू. सध्या राज्यभरात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. सातारा जिल्ह्यात 450 पेक्षा जास्त केंद्रावर लसीकरण केले जात असून सातारा शहरात शासकीय जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात लसीकरण होते आणि यासाठी एकच केंद्र असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगाच रांगा लागत होत्या, नागरिकांना सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत उन्हात ताटकळत थांबावे लागत होते. यात वृद्ध लोकांचे खूप हाल होत असल्याचे निदर्शनास आल्यावर याबाबत तरुण भारतने एक लेख माला प्रसिद्ध करून या ठिकाणी होणारी गर्दी आणि त्यामुळे संभाव्य कोरोना पसरण्याची भिती याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून जादा लसीकरण केंद्र जिल्हा रुग्णालयात असलेल्या इतर जागेत सुरू करावीत अशी मागणी केली होती.
जिल्हा रुग्णालयासमोर असणाऱ्या सेंट पॉल या शाळेत स्वतंत्र केंद्र निर्माण करून प्रत्येक केंद्रावर वेगवेगळ्या लसी देण्यात यावेत अशी मागणी केली होती. या बाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात आली होती.
या मागणी वर विचार करून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आज पासून सेंट पॉल स्कूल या ठिकाणी स्वतंत्र केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून या केंद्रावर फक्त कोविशील्ड ही लस दिली जाणार आहे आणि आधीच केंद्रावर कोव्हॅक्सीन ही लस दिली जात आहे. यामुळे या केंद्रावर होणारी मोठी गर्दी कमी झाली असून नागरिकांनाचे जलद गतीने लसीकरण होत आहे. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत तरुण भारतचे आभार मानले आहेत.