प्रतिनिधी / नागठाणे :
कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव (ता.सातारा)ची शास्त्रीय सल्लागार समिती बैठक ऑनलाईन पध्दतीने नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, संचालक, विस्तार शिक्षण डॉ. एस. आर. गडाख व आयसीएआर-अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी विद्यापीठ व जिल्हास्तरीय कृषि सलंग्न विभागांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे व कृषि विज्ञान केंद्राच्या उपक्रमांमध्ये महिला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सहभागी करुन घ्यावे व उत्पन्न वाढीसाठी त्यांच्यापर्यंत विविध योजनेची माहिती करुन द्यावी अशा सुचना केल्या. डॉ. लाखन सिंग व डॉ. शरद गडाख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
बैठकीस डॉ.प्रसाद व डॉ. सोमकुवर तसेच जिल्ह्यातील कृषि विभाग, मत्स विभाग, रेशीम, नाबार्ड, जिल्हा मध्यवर्ती बँक, ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अन्न सुरक्षा अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, कराड, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, कोल्हापुर व प्रगतशिल शेतकरी उपस्थित होते.