सातारा / प्रतिनिधी :
वारसदार म्हणून नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरकुटे-म्हसवड, ता. माण येथील तलाठी दादासो अनिल नरळे, (वय 37, रा. पानवण, ता. माण) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
याबाबत अधिक माहिती अशी, दादासो अनिल नरळे यांनी वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये तक्रारदार व त्यांची बहिण यांचे वारसदार नाव नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी करून वरकुटे येथे सापळा लावण्यात आला. त्यामध्ये दादासो नरळे दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अलगत जाळ्यात अडकले.