फलटण / प्रतिनिधी :
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन होम आयसोलेशन संकल्पनेंतर्गत कोरोनाबाधीत रुग्णांसाठी तिरकवाडी ता. फलटण येथे कोरोना दक्षता कमिटी, ग्रामपंचायत तिरकवाडी व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून जयभवानी हायस्कूल येथे 11 बेडचे होम आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच नानासाहेब काळुखे यांनी दिली आहे.
तिरकवाडी ता. फलटण व परिसरात कोरोना पेशंटची वाढती संख्या लक्षात घेऊन गावामध्ये होम आयसोलेशन सेंटर सुरु व्हावे, यासाठी जयभवानी हायस्कूल, तिरकवाडी येथे 2 वर्ग खोल्या उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर लोकवर्गणी व तिरकवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनाबाधीत रुग्णांसाठी बेड व इतर साधने, औषधोपचार साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी मदत व सहकार्य केल्याचे उपसरपंच नानासाहेब काळुखे यांनी निदर्शनास आणून दिले.
गावचे रहिवासी व णमोकार मेडिकल, फलटणचे संजय शहा यांनी 3 बेड, गावचे सुपुत्र व उस्मानाबाद वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांनी 2 बेड, आनंदराव गोविंदराव सोनवलकर यांनी 2 बेड, संभाजी शंकर शिंदे यांनी 2 बेड, मुरलीधर गणपत नाळे (गुरुजी) यांनी 1 बेड व ग्रामपंचायत तिरकवाडी सदस्या आरती महेश सोनवलकर पाटील यांनी 1 बेड असे 11 बेड उपलब्ध करुन दिले आहेत.
तिरकवाडी ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेचे 1946 सालचे इयत्ता 4 थी मधील माजी विद्यार्थी अतुल सोनवलकर, सिराज शेख, श्रीकांत बनकर, विशाल सोनवलकर, दस्तगीर शेख, प्रशांत काळभोर, पुरुषोत्तम नाळे, दीपक धोटे, श्रीकांत शिंदे यांनी ही संकल्पना समजल्यानंतर उत्स्फूर्तपणे पुढे येऊन 5 ऑक्सीमीटर, 10 डिजीटल थर्मामीटर, 2 बीपी चेक मॉनिटर, 400 मास्क, 2 कॅन सॅनिटायझर, 25 सॅनिटायझर स्प्रे व 10 स्टीमर मशीन उपलब्ध करुन दिले आहेत.