दहा वर्षांखालील 2 हजार 280 मुले कोरोना बाधित : एक वर्षाखालील 17 बालकांचा समावेश
- आतापर्यंतच्या एकूण रुग्णांमध्ये युवाईच टार्गेट
- 31 ते 40 वयोगटातील सर्वाधिक 8,146 रुग्ण
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र त्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हय़ात लहान मुलांना कोरोनाने विळखा घातला आहे. जिल्हय़ात आतापर्यंत दहा वर्षांखालील 2 हजार 380 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये एक वर्षाच्या आतील सतरा बालकांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या 44 हजार रुग्णांमध्ये कोरोनाने तरुणाईला टार्गेट केले असून 31 ते 40 वर्षे वयोगटातील सर्वाधिक 8 हजार 146 रुग्ण आढळले आहेत.
कोरोना बाधित बहुतांश मुले बरी झाली असून काही मुले उपचाराखाली आहेत. त्यांचीही प्रकृती चांगली आहे. सर्व मुलांची तब्येत चांगली असली, तरी कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची भीती वर्तवली गेली आहे.
कोरोनाने केले तरुणाईला टार्गेट
जिल्हय़ात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून 9 जुलैपर्यंत 43 हजार 997 कोरोना बीधत रुग्ण आढळले. यामध्ये दहा वर्षांखालील 2 हजार 380 लहान मुलांना कोरोनाची बाध झाली आहे. तर सर्वाधिक बाधित रुग्ण हे 31 ते 40 वर्षे वयोगटातील (8 हजार 146 रुग्ण) आहेत. त्या शिवाय 11 ते 20 वर्षे वयोगटातील 4 हजार 469 जणांना, 21 ते 30 वर्ष वयोगटातील 7 हजार 199 जणांना, 31 ते 40 वर्ष वयोगटातील 8 हजार 146 जणांना, 41 ते 50 वर्षे वयोगटातील 7 हजार 815 जणांना, 51 ते 60 वर्षे वयोगटातील 6 हजार 507 जणांना, 61 ते 70 वर्षे वयोगटातील 4 हजार 837 जणांना आणि 71 वर्षांवरील 2 हजार 649 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही आकडेवारी पाहता तरुण लोकांना कोरोनाने टार्गेट केल्याचे दिसून येत असून लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाच्या तिसऱया लाटेत संभाव्य धोका असलेल्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी अलर्ट राहवेच लागणार आहे.
संभाव्य तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा धोका वर्तवला गेला आहे. याचा सामना करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. कोरोनाची तिसरी लाट परतवून लावण्यासाठी आणि लहान मुलांची काळजी घेण्यासाठी कुडाळ व ओरोस येथे लहान मुलांसाठी 50 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. कुडाळला सहा केएलचा ऑक्सिजन रिफिलिंग प्लान्ट व ओरोस येथे 13 केएलचा ऑक्सिजन रिफिलिंग प्लँट सुरू करण्यात आली आहे. डॉक्टरांची कमतरता राहू नये, यासाठी खासगी बालरोगतज्ञ डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. त्यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
न्यूमोकोकल लसने बाल मृत्यू रोखले जातील – डॉ. संदेश कांबळे
जिल्हय़ात गेल्या दीड महिन्यात बालकांना न्यूमोकोकल लस दिली जाणार आहे. याचे 500 डोस उपलब्ध झाले आहेत. या लसमुळे बालमृत्यू रोखले जातील, असा विश्वास जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी व्यक्त केला आहे. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणार एक संसर्ग आहे. त्याने फुफ्फुसला सूज येऊन, पाणी भरून श्वास घेण्यास त्रास होतो. अशा गंभीर परिस्थितीत बालकांचा मृत्यूही होऊ शकतो. म्हणूनच नवजात बालकांना न्यूमोकोकल लस दिली जाणार आहे. जिल्हय़ात गेल्या तीन वर्षांत 184 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. मात्र न्यूमोकोकल लस बालमृत्यू रोखण्यास महत्वाची ठरेल. त्याचप्रमाणे कोरोनाच्या तिसऱया लाटेपासून ही बालके वाचतील, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.