गौरव सोळंकी, प्रयाग, ब्रिजेश या तीन मुष्टियोद्धय़ांचा समावेश, प्रशिक्षक पथकातील 5 सदस्यांनाही लागण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तुर्की दौऱयावर गेलेल्या भारतीय मुष्टियुद्ध संघातील 3 मुष्टियोद्धय़ांसह 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इस्तंबूलमध्ये स्पर्धेत सहभागी झालेल्या या आठही सदस्यांना इस्तंबूलमध्येच क्वारन्टाईन केले गेले आहे.
राष्ट्रकुल रौप्यविजेता गौरव सोळंकी (57 किलोग्रॅम), प्रयाग चौहान (75 किलोग्रॅम), ब्रिजेश यादव (81 किलोग्रॅम) हे तीन मुष्टियोद्धे कोरोनाबाधित झाले आहेत. याशिवाय, प्रशिक्षक धर्मेंद्र यादव, संतोष बिरमोले, फिजिओथेरपिस्ट शिखा केडिया, डॉ. उमेश, व्हीडिओ ऍनालिस्ट नितीन कुमार यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आठवडाभरापूर्वी या सर्वांना सदर विषाणूची बाधा झाली. सध्या हे सर्व सदस्य क्वारन्टाईन असून ही स्पर्धा दि. 19 मार्चला समाप्त झाली. इस्तंबूलमधील बॉसफोरस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय पथक तेथे गेले हेते.
या स्पर्धेत सोळंकीने पुरुष गटात कांस्यपदकाची कमाई केली तर महिला गटात निखत झरीनने (51 किलोग्रॅम) आणखी एक कांस्य कमावले. भारताला या स्पर्धेत एकूण ही दोन पदकेच मिळवता आली.
या स्पर्धेत भारतीय संघातर्फे ललित प्रसाद (52 किलोग्रॅम), शिवा थापा (63 किलोग्रॅम), दुर्योधन सिंग नेगी (69 किलोग्रॅम), नमन तनवर (91 किलोग्रॅम) व कृष्णन शर्मा (91 किलोवरील) यांनी प्रतिनिधीत्व केले होते. महिला संघात झरीन, सोनिया लाथेर (57 किलोग्रॅम), परवीन (60 किलोग्रॅम), ज्योती ग्रेवाल (69 किलोग्रॅम), पूजा सैनी (75 किलोग्रॅम) यांचा समावेश होता.
आता जे 8 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत, त्यांना आणखी किमान 1 आठवडा प्रतीक्षा करावी लागणार असून त्यानंतरच ते नव्याने चाचणी करवून घेऊ शकतील. पुढील अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना मायदेशी परतण्याची परवानगी मिळू शकेल, असे चित्र आहे.