क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
मिरामारच्या क्लुब टेनिस दी गास्पार दियशने आयोजित केलेल्या गद्रे गास्पार दियश टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीतील अंतिम लढत गतवर्षीय विजेता कर्नाटकचा प्रणीथ वेणुगोपाळ आणि उपविजेता गोव्याचा तेजस शेवडे यांच्यात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन क्लुबच्या आणि पणजी जिमखानाच्या टेनिस कोर्टवर करण्यात येत आहे.
या स्पर्धेचे चार वेळा जेतेपद मिळविलेल्या तेजस शेवडेला गेल्या वर्षी अंतिम सामन्यावेळी झालेल्या इंज्युरीमुळे प्रणीथविरूद्धचा सामना सोडून दय़ावा लागला होता. पुरूष एकेरीतील उपान्त्य सामन्यात मडगावच्या तेजस शेवडेने सूरज बिक्कान्नवरचा 6-0, 6-0 असा सहज पराभव केला तर प्रणीथ वेणुगोपाळने अँड्रय़ूला 6-1, 6-3 असे पराभूत केले.
पुरूष दुहेरीतील उपान्त्य सामन्यात काफील कडवेकर – आश्विन नरसिंगानीने अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना अँड्रय़ू व राजू एम. या जोडीचा 6-7, 6-3, 10-7 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत संतोष व मॅलनी चौगुले जोडीने एम. आदर्श व बबिता अँथनी जोडीला 7-6, 6-2 असे नमवून अंतिम फेरी गाठली.
दरम्यान, 12 वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील अंतिम लढतीत अखिलेश चव्हाणने जेतेपद मिळविताना आदित्य जाधवचा 4-1, 4-3 असा पराभव केला. त्यापूर्वी झालेल्या उपान्त्य लढतीत अखिलेश चव्हाणने अरहान इनामदारचा 4-3, 3-4, 10-8 असा तर आदित्य जाधवने क्यानला 4-0, 4-0 असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती.