क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आमोणाच्या साईबाबा स्पोर्ट्स क्लबने साखळी जिमखानाचा 19 धावानी पराभव करून गोवा क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या डिचोली-सत्तरी ‘ब’ विभाग लीग क्रिकेट स्पर्धेत विजय नोंदविला. काल हा सामना धारबांदोडा पंचायत मैदानावर खेळविण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना साईबाबा स्पोर्ट्स क्लबने आपल्या डावात 34.4 षटकात सर्वबाद 186 धावा केल्या. त्यांच्या रुपल सिनारीने 34, महेश परबने 28, काशिनाथ फोंडेकरने 24 तर दिनेश गावसने 23 धावा केल्या. साखळी जिमखानाच्या संकेत झोरेने 41 धावात 4 तर अक्षय पेडणेकरने 35 धावात 2 गडी बाद केले.
त्यानंतर साखळी जिमखानाचा डाव 36 षटकात 167 धावात संपला. त्यांच्या संकेत झोरेने गोलंदाजप्रमाणे फलंदाजीतही अष्टपैलूत्व दाखविताना 53 धावा केल्या. या व्यतिरिक्त अनिरुद्ध नाईकने 24 तर जयन सातोडकरने 19 धावा केल्या. साईबाबा स्पोर्ट्स क्लबसाठी किशोर सिनारीने 23 धावात 3, दिनेश गावसने 39 धावात 3 तर अभिजीत सिनारीने 26 धावात 3 गडी बाद केले.