मुलाने थप्पड लगावल्यावर वृद्ध आईचा मृत्यू – आरोपीला अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ज्या आईने जन्म दिला, जिने बोट पकडून चालणं शिकविलं, बोलणं शिकविलं, वृद्धापवस्थेत त्या आईला स्वतःच्या अपत्याकडून सहाय्याची अपेक्षा असते. पण एका क्रूर मुलाने स्वतःच्या आईला अशी थप्पड लगावली, ती जमिनीवर कोसळली आणि यातूनच तिचा मृत्यू ओढवला आहे. राजधानी दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे.
द्वारका भागात पार्किंगवरून झालेल्या भांडणात संतापलेल्या मुलाने स्वतःच्या आईच्या कानशिलात लगावली. या थप्पडमुळे त्याची आई जमिनीवर कोसळली आणि नंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. द्वारकाचे पोलीस उपायुक्त संतोष कुमार मीणा यांनी घटनेची पुष्टी केली आहे. चित्रफित सर्वत्र प्रसारित झाल्यावर पोलिसांनी तपास केला असता ही बाब समारे आली आहे. या घटनेवरून सोशल मीडियावर लोकांमध्ये मोठा संताप दिसून येत आहे.
15 मार्च रोजी दुपारी 12.07 वाजता बिंदापूर पोलीस स्थानकात भांडणासंबंधी एक पीसीआर कॉल आला होता. यावर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता इमारतीच्या मालकासोबत पार्किंगवरून वाद झाला होता, पण आता तो मिटला असून पुढील कारवाईची गरज नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे पोलीस पथक माघारी परतले होते.
या पूर्ण घटनेनंतर एका चित्रफितीद्वारे वेगळाच खुलासा झाला. या घटनेवेळी पार्किंगच्या मुद्दय़ावरून एक वृद्ध महिला अवतार कौर (76 वर्षे), त्यांचा पुत्र रणवीर आणि सून यांच्यात जोरदार वादावादी झाली. या वादादरम्यान रणवीने स्वतःच्या आईला थप्पड लगावली. अवतार यांना स्वतःला सावरता न आल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. सून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असल्याने तर मुलगा दूर उभा असल्याचे चित्रफितीत दिसून येते.
घटनेनंतर वृद्ध महिलेला मुलाने आणि सुनेने रुग्णालयात नेले, जिथे त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अधिकृत तक्रार नसली तरीही पोलिसांनी तपास चालविला असल्याचे सांगण्यात आले आहे.