जागतिक लोकशाहीसंबंधी अहवालाचाही विचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशी थिंकटँककडून भारतीय लोकशाही कमकुवत झाल्याचा दावा करण्यात आला होता. याचमुळे भारतीय विदेश मंत्रालय आता एखाद्या स्वतंत्र भारतीय थिंकटँककडून ‘वर्ल्ड डेमोक्रसी रिपोर्ट’ आणि ग्लोबल प्रेस फ्रीडम इंडेक्स’ तयार करविण्याचा विचार करत आहे. विदेशी थिंकटँक फ्रीडम हाउस आणि वी-डेमकडून प्रसिद्ध अहवालांमध्ये भारतातील स्वातंत्र्य संकुचित पावत असल्याचा दावा केला होता.
विदेश मंत्रालयाकडून चालू वर्षाच्या प्रारंभी एक अंतर्गत अहवाल तयार करण्यात आला होता. भारतातीलच एखाद्या स्वतंत्र थिंकटँकला विधि मापदंडांच्या आधारावर स्वतःचा वार्षिक वर्ल्ड डेमोक्रेसी रिपोर्ट आणि वार्षिक फ्रीडम प्रेस इंडेक्स तयार करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो असे विदेश मंत्रालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्रसारभारतीचे माजी अध्यक्ष आणि नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे वर्तमान कार्यकारी सदस्य ए. सूर्यप्रकाश यांच्याकडून आलेले एक पत्र पंतप्रधान कार्यालयाने विदेश मंत्रालयाला पाठविले होते. यानंतरच लोकशाही संबंधी जागतिक अहवाल तयार करविण्याचा विचार सुरू झाला होता. स्वीडनच्या वी-डेम इन्स्टीटय़ूट आणि प्रेस फ्रीडम इंडेक्सकडून प्रसिद्ध अहवालासह अन्य अहवालांना भारताने विरोध करावा असे सूर्यप्रकाश यांनी सुचविले होते.
जगभरातील भारतीय दूतावासांनी जागतिक स्वयंसेवी संस्था आणि इन्स्टीटय़ूटसोबत संपर्क प्रस्थापित करावा. अशा संस्थांना भारताशी संबंधित वस्तुस्थिती उपलब्ध करा, जेणेकरून भविष्यातील अहवालात लोकशाही आणि प्रेस फ्रीडम इंडेक्सप्रकरणी भारताला योग्य स्थान मिळू शकेल असे विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत अहवालात नमूद करण्यात आले होते.