ऑनलाईन टीम / मुंबई :
‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजप नेत्यांकडून टीकेची झोड उठत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पटोले यांच्या अटकेची मागणीही केली आहे. दरम्यान, पटोले यांनी आता मी ज्या मोदीविषयी बोलत होतो, तो गावगुंड असून त्याला भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक आज, मंगळवारी होत आहे. त्यानिमित्ताने 16 जानेवारीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील सभेत पटोले यांनी ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारावर पटोले यांनी स्पष्टीकरण दिले होते की, मी ज्या मोदी विषयी बोलत होतो, तो गावगुंड आहे. त्याची अनेकांनी माझ्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे मी बोललो. तुम्हाला कोणता मोदी म्हणायचा आहे, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला होता. तरीही भाजप नेते आक्रमक झाले आहेत. पटोलेंवर टीका होत आहे. असे असतानाच मी ज्या मोदीविषयी बोलत होतो, त्याला भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.