थायलंडच्या हुआ हीन येथे अजब प्रकार घडला आहे. येथे एक विशाल हत्ती अन्नाच्या शोधात एका घराची भिंत फोडून त्याच्या किचनमध्ये (स्वयंपाकघर) दाखल झाला. घराच्या मालकिणीने या घटनेची छायाचित्रे आणि चित्रफिती सोशल मीडियावर प्रसारित केल्यावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ‘तू रोज येऊ शकतोस’ असे या महिलेने स्वतःच्या पोस्टमध्ये हत्तीसाठी नमूद केले आहे.
रविवारी रात्री सुमारे 2 वाजता घराबाहेर काही विचित्त आवाज ऐकू आले. काय घडतेय हे पाहण्यासाठी बेडवरून उठल्यावर समोर पाहिलेले दृश्य दंग करणारे होते. एक विशाल हत्तीने आमच्या घराच्या भिंतीत मोठे छिद्र पाडून स्वतःच्या सोंडेने किचनमध्ये खाण्यासाठी काहीतरी शोधत असल्याचे दिसून आल्याची माहिती घराच्या मालकिणीने दिली आहे.
तरी बरं रागीट नव्हता..
सुदैवाने हत्ती रागीट नव्हता, किचनची भिंत तोडून हत्ती स्वतःच्या सोंडेने खाण्यासाठी काहीतरी शोधत असताना महिलेने घाबरतच त्याची छायाचित्रे काढून घेतली तसेच चित्रण देखील केले आहे.
सरकार देणार भरपाई
द डिपार्टमेंट ऑफ नॅशनल पार्क, वाइल्ड लाइफ अँड प्लँट कंजर्व्हेशन आणि अन्य सरकारी संस्था घरमालकाला नुकसान भरपाई देणार आहेत. सरकारी संस्था लवकरात लवकर पीडिताच्या घराच्या दुरुस्तीचा प्रयत्न करतील असे विभागाने म्हटले आहे. तसेच अधिकाऱयांनी परिसरात हत्तींपासून ग्रामस्थांना असणाऱया धोक्यांना रोखण्याच्या पद्धतींविषयी माहिती दिली आहे.