वृत्तसंस्था/ कोलंबो
दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी सलामी देताना शुक्रवारी झालेल्या पहिल्या लढतीत यजमान लंकेचा 28 धावांनी पराभव केला. सदर सामना येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविला गेला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 5 बाद 163 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 135 धावांत आटोपला.
दक्षिण आफ्रिकेतर्फे हेंड्रिक्स आणि डी कॉक या जोडीने सलामीच्या गडय़ासाठी 73 धावांची भागिदारी केली. लंकेच्या हसरंगाने डी कॉकला 36 धावांवर बाद केले. पुढील षटकात हेंड्रिक्स 38 धावांवर तंबूत परतला. लंकेच्या तिक्षणाने क्लेसनला 2 धावांवर पायचीत केले.
मार्करेम आणि मिलर यांनी 65 धावांची भागीदारी केली. मार्करेमने 48 तर मिलरने 26 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. वेगवान गोलंदाज नॉर्त्जे तसेच फिरकी गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. लंकेतर्फे चंडिमलने एकाकी लढत दिली. पण, त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही.