ओवैसी यांच्या पक्षाकडून लढविणार निवडणूक
निवडणुकीत मुस्लिमांच्या प्रत्येक वर्गाला जोडण्याची धडपड गतिमान झाली आहे. राजकारणापासून दूर राहिलेल्या कुटुंबाचे लोकही आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. ऑल इंडिया मजलिस-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दरगाह आला हजरतचे प्रमुख मौलाना सुब्हानी मियां यांचे जावई सय्यद आसिफ मियां यांना उत्तराखंडच्या खटीमा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. सय्यद आसिफ मियां यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
सय्यद आसिफ मियां हे उत्तरप्रदेशच्या बरेलीत वास्तव्यास आहेत. उत्तराखंडच्या खटीमामध्ये त्यांचे घर आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताच ते चर्चेत आले आहेत. अनेक लोक दरगाहचे नाव बदनाम करू पाहत आहेत. मी दरगाहच्या नावाचा वापर राजकारणात कधीच केला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
1975 मध्ये या दरगाहमधून नसबंदीच्या विरोधात आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर दरगाहचे सज्जादनाशील मौलाना रेहान रजा खां यांना काँग्रेस सरकारने विधान परिषदेवर पाठविले होते. मौलाना तौकीर रजा खां यांनी 7 ऑक्टोबर 2001 रोजी आयएमसीची स्थापना करून राजकारणाची सुरुवात केली होती. 2004 साली आयएमसीने निवडणुकीत भाग घेतला होता. तर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आयएमसीने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मौलाना मन्नानी मियां यांनी बरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
2007 मध्ये बसप सरकार असताना आला हजरत दरगाहचे सज्जादानशील मुफ्ती अहसन रजा खां यांना मदरसा मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. 2012 साली सप सरकार असताना दरगाह प्रमुखांचे खासगी सचिव राहिलेले आबिद रजा यांना आयोगाचा सदस्य करण्यात आले होते. तौकीर मियां यांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला होता.
मौलाना तौकीरच्या चालकाचा अर्ज
बरेली शहर मतदारसंघातून मौलाना तौकीर मियां याचे चालक राहिलेल्या रईस मियां याने उमेदवारी अर्ज भरला आहे. तर आयएमसीशी संबंधित नेता मखदूम बेगने अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.