दरोडय़ाचा गुन्हा 48 तासात उघड डोळय़ात चटणी टाकून लुटणारे 5 दरोडेखोर जेरबंद,अंडी डिलीव्हरी बॉयला लुटण्याचा प्रकार
प्रतिनिधी /सातारा
शेंद्रे गावच्या हद्दीत सोमवारी दि. 8 रोजी मध्यरात्री सांगली येथील अंडी डिलीव्हरी करणाऱया कर्मचारी विनायक विजय हाके (वय 30 रा. सांगली) याच्या डेळ्यात चटणी टाकून मोबाईलसह 52 हजार 680 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या दरोडय़ातील 8 संशयितापैकी 5 जणांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोल्ट्री फार्मच्या मालकासोबत पैशावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना अजयकुमार बन्सल पुढे म्हणाले, हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार धुमाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते.
पथकाने घटनास्थळी पाहणी करून या गुह्यातील फिर्यादी तसेच त्याच्यासोबत हजर असलेला गाडीवरील क्लिनर, इतर साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केली असता पथकाला एक महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने सातारा शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गोपनीय बातमीदारांना मार्फत खातरजमा केली असता हा गुन्हा सातारा शहरातील एका संशयिताने त्याच्या जामखेड (जि. अहमदनगर) आणि बीड येथील साथीदारांसह केला असून संबंधित संशयित त्याच्या मूळगावी भुम, जि. उस्मानाबाद येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भुम व बीड येथे जाऊन वरील पाच जणांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
जुन्या भांडणाचा राग मनात धरून…
शेंद्रे गावच्या हद्दीत घडलेल्या दरोडा प्रकरणातील मुख्य संशयित शिवाजी महादेव अडागळे (वय 33 रा. वनवासवाडी, मूळ रा. उस्मानाबाद) यांची अंडी डिलीव्हरी करणाऱया सांगली येथील पोल्ट्री फार्मच्या मालकाशी पैशाच्या घेण्या-देण्यावरून भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून त्याने संशयित सचिन रावसाहेब पवार (वय 25 रा. जामखेड), सोमनाथ गोपीनाथ गायकवाड (वय 23 रा. जामखेड), गोविंद वासुदेव घुमरे (वय 24 रा.पारगाव ता. बीड), दशरथ भुजंग क्षीरसागर (वय 32 रा. प्रतापसिंहनगर, सातारा) व अन्य तीन जण असे एकत्र येवून दरोडा टाकला. याची कबुली कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. यातील सचिन रावसाहेब पवार यांच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत. तसेच या आरोपीवर नगर, बीड व इतर जिह्यात गुन्हे दाखल आहेत. ही आतंरजिल्हा टोळी आहे. यातील संशयित दशरथ क्षीरसागर हा सातारा शहरातील आहे. आत्तापर्यंत 23 हजार रूपये हस्तगत करण्यात आले आहेत. अजून 3 आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे आदींनी सहभाग घेतला.