काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची पंतप्रधान मोदींकडून प्रशंसा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या आणि प्रचंड प्रमाणात लोकप्रिय होत असलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंड भरुन स्तुती केली आहे. या चित्रपटामुळे काश्मीर संबंधातली अनेक दशके हेतुपुरस्सर दडविलेली सत्ये आता बाहेर येत आहेत. यामुळे काश्मीरमधील अनेक दुःखद घटनांचा खरा इतिहास लोकांना समजत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा नाचविणारे लोक काश्मीरी हिंदूंवरील अत्याचार आणि अन्यायावर मूग गिळून गप्प असतात. त्यांना आता अतिशय अस्वस्थ वाटत असेल, असा टोला त्यांनी लगावला. हा चित्रपट काश्मीरवर लोकांचे खरे प्रबोधन करणारा असून या धाडसासाठी चित्रपटाचे निर्माते प्रशंसेस पात्र आहेत, अशी टिप्पणी त्यांनी भाजप संसदीय समितीच्या बैठकीत केली.
ही बैठक येथे मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध सोमवारपासून सुरु झाला आहे. या भागात विरोधकांवर कुरघोडी कशी करायची याचे धोरण ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी स्पष्टपणे काही भाष्य केले.
मी तिकीटे कापली
भाजपमध्ये घराणेशाहीला आम्ही थारा देणार नाही. केवळ पिता किंवा कोणी नातेवाईक उच्च पदावर आहे म्हणून ते पद त्याच्या पुढच्या पिढय़ांना वारशाने दिले जाणार नाही.